बेळगाव (कर्नाटक) Deepfake Photo Case : अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातही डीपफेक फोटो एडिटिंगचे प्रकरण समोर आलं आहे. प्रेमास नकार दिल्यामुळं तरुणी अन् तिच्या दोन मैत्रीनींचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या खानापूर येथील तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मंथन पाटील (वय 22) असं आरोपीचं नाव आहे.
तरुणीच्या मैत्रिणींचे फोटोही केले एडिट : एडिट केलेल्या फोटोंच्या आधारे आरोपी पीडित तरुणीला धमकावू लागला. मात्र पीडितेनं त्याचं म्हणणं ऐकलं नाही. त्याच्या प्रेमाला नकार दिला. यानंतर आरोपीनं तरुणीच्या मैत्रिणींचे फोटो सोशल मीडियावर एडिट करून ते व्हायरल करण्यास सुरुवात केली. हा प्रकार लक्षात येताच पीडित मुलींनी पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलीय.
याप्रकरणी बेळगावचे एसपी काय म्हणाले? : या प्रकरणी बेळगावचे एसपी डॉ.भीमाशंकर गुलेडा यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना सांगितले की, फोटो एडिट करून तरुणींना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी आरोपी मंथन पाटील याला अटक करण्यात आली. एका तरुणीनं आरोपीला प्रेमासाठी नकार दिला. त्यानंतर आरोपीनं तरुणीच्या नावाचं बनावट खातं तयार करून ‘डीप फेक’ या तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो एडिट केले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली. तसंच तरुणीवर अधिक दबाव आणण्यासाठी त्यानं तिच्या दोन मैत्रिणींचे फोटोदेखील एडिट करून अपलोड केले. या संदर्भात तरुणींनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानंतर मंथन पाटीलला अटक करण्यात आली. दरम्यान, अशाप्रकारे कोणी ब्लॅकमेलिंग आणि फोटो एडिट करत असल्यास तत्काळ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार द्यावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
काय आहे 'डीपफेक तंत्रज्ञान' : 'डीपफेक' हा शब्द कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) प्रकारातून आला आहे ज्याला डीप लर्निंग म्हणतात. नावाप्रमाणेच deepfakes बनावट घटनांच्या प्रतिमा तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात. डीप लर्निंग अल्गोरिदम डेटाच्या मोठ्या संचातील समस्यांचं निराकरण कसं करावं हे स्वतः शिकू शकतात. हे तंत्रज्ञान बनावट मीडिया तयार करण्यासाठी व्हिडिओ आणि इतर डिजिटल सामग्रीमध्ये चेहरे बदलण्यासाठी वापरले जाते. डीपफेक केवळ व्हिडिओपुरते मर्यादित नाही. या तंत्रज्ञानाचा वापर प्रतिमा, ऑडिओ इत्यादी इतर बनावट सामग्री तयार करण्यासाठीदेखील केला जाऊ शकतो.
हेही वाचा -