नवी दिल्ली - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती वरिष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना केली आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका असल्याचा इशारा थरुर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यास शशी थरुर यांनी सरकारला अनेकवेळा सांगितले आहे. कोरोना संकटकाळात परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा मानसिक तणाव कमी होईल, असे मत त्यांनी मांडले आहे. यासंबधी एक पत्रही थरुर यांनी मुख्यमंत्री विजयन यांनी लिहले आहे.
मानसिक तणावात असल्याचे ई-मेल पाठवतायेत विद्यार्थी
केरळ विद्यापीठ, केरळ तंत्रज्ञान विद्यापीठ आणि महात्मा गांधी विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयामुळे मानसिक तणावात असल्याचा मेल 3 हजार 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकाच आठवड्यात केल्याचे थरुर यांनी सांगितले. राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना विद्यार्थ्यांना घराबाहेर निघून परीक्षा द्याव्या लागतील, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, असे थरुर यांनी पत्रात म्हटले आहे.
ज्या भागात कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून आले आहेत, अशा भागात विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त धोका आहे. तसेच कोरोनामुळे सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत, जसे की, सोशल डिस्टन्सिंग, इंटरनेट कॅफे बंद करण्यात आले आहेत, सार्वजनिक वाहतूक सेवा कमी प्रमाणात सुरु असल्याने याचा विद्यार्थ्यांना त्रास होईल, असे थरुर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सांगितले आहे.