नवी दिल्ली - गुगल सर्च इंजिन हे नेटकऱयांचे लाडके शोध साधन आहे. आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग असलेल्या सर्च इंजिन गुगलचा आज 21 वाढदिवस आहे. यानिमित्ताने गुगलने जुन्या कम्प्युटरच्या थ्रो बॅक फोटोचे खास डुडल साकारले आहे.
गुगलने अनेक महत्त्वाच्या घटना, महान व्यक्तींची पुण्यतिथी, जयंती या दिवशी डुडलद्वारे त्या व्यक्तीनां मानवंदना दिली. जगातल्या प्रसिद्ध व्यक्तींचे वाढदिवस विशेष डुडल साकारून सेलिब्रेट करणाऱ्या गुगलनं स्वत:च्या वाढदिवसाचं देखील खास डुडल साकारलं आहे. २० शतकामधील कम्प्युटर डुडलमध्ये पाहायला मिळत आहे. त्या फोटोवर २७ सप्टेंबर १९९८ अशी तारीख देण्यात आलेली आहे. यासोबत मॉनिटर, कीबोर्ड, माउस आणि प्रिंटरही पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी गुगलने डुडलवर एक व्हिडिओ प्ले केला होता. त्या व्हिडिओत गुगलंनं गेल्या विस वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला होता.
लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली. १९९७ साली कंपनीनं डोमेन रजिस्टर करत अधिकृतपणे 'गुगल' हे नाव ठेवले. गुगल हे सर्च इंजिन नऊ भारतीय भाषांमध्ये आणि जगभरातल्या १२४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. गूगलचे मुख्यालय अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. मागील २० वर्षांत गुगलने यशाची उत्तुंग झेप घेतली असून भारतात Google.co.in ही सेवा मराठी, हिंदीसह नऊ भारतीय भाषांत उपलब्ध आहे.