मुंबई - मौद्रीक धोरण समितीच्या ३ दिवसीय बैठकीनंतर रिझर्व बँकेचे आगामी त्रैमासीक धोरण जाहीर करण्यात आले आहे. यावेळी रेपो दरात पाव टक्के कपात केली असून रेपो दर ६ टक्क्यांवरून ५.७५ टक्के करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
रिझर्व बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय मौद्रीक धोरण समितीने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी त्रैमासिक मौद्रीक धोरण समिक्षा बैठक ३ जून रोजी सुरू केली होती. या बैठकीच्या चर्चेनंतर आज आरबीआयचे रेपो दर जाहीर करण्यात आले. लोकसभा निडवणुकीच्या निकालानंतर मौद्रीक धोरण समितीची ही पहिलीच बैठक होती.
रेपो दरात कपात केल्याने गृहकर्जांसह वाहनकर्ज आणि वैयक्तीक कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च २०१९ नंतर आतापर्यंतची रेपो दरातील सलग तीसरी कपात आहे. अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था देण्यासाठी अधिकाधिक कर्जवाटप करून लोकांची क्रयशक्ती वाढवण्यावर सरकार भर देत आहे.