इस्लामाबाद - पुलवामा हल्ल्याबाबत पाक लष्कराने पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानची भूमिका स्पष्ट केली आहे. भारतात लोकसभा निवडणुका जवळ आल्यानेच पुलवामा हल्ला झाला असल्याचे पाक लष्कराने सांगितले आहे. तसेच भारतच युद्धाची धमकी देत आहे, असा कांगावाही पाककडून करण्यात आला आहे.
पुलवामा हल्ल्यावरुन भारताकडून पाकिस्तानवर आरोप केले जात आहेत. मात्र, पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताकडे याबाबत पुरावे मागितले होते. त्यांनी कुठलेही पुरावे दिले नाहीत, असेही पाकने म्हटले आहे. पुलवामा हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानात ८ मोठे इव्हेंट होत होते. पाकिस्तानात शांतता होती, असेही पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
पुलवामा हल्ल्यात आमचा हात नव्हता. या हल्ल्याचा पाकिस्तानला काहीच फायदा नसून उलट आमचे नुकसानच झाले आहे, असेही पाककडून सांगण्यात आले. भारत विचार न करता पाकिस्तानवर आरोप करत आहे. पुलवामा हल्ल्यातील स्फोटकं पाकिस्तानी नसल्याचेही पाकने स्पष्ट केले. पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेली गाडी काश्मीरमधीलच होती, असेही त्यांनी म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यातील मुख्य सुत्रधार आदिल अहमद दार याच्या अंत्यसंस्कारावेळी हजारोंची गर्दी जमली होती. यातून वेगळाच संदेश जातो, असेही पाक लष्कराने म्हटले आहे.
