नवी दिल्ली - काँग्रेसला पंतप्रधानपद मिळाले नाही तरी चालेल. मात्र, एनएनडीएला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे, असे विधान काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच सर्वत्र पंतप्रधानपदाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
यावेळी आझाद म्हणाले, आम्ही याआधीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसच्या बाजूने निकाल आल्यास आम्ही नेतृत्व करू. पण एनडीएचे सरकार सत्तेत पुन्हा येवू नये, हेच आमचे लक्ष्य आहे. सर्वसंमतीने घेण्यात आलेल्या निर्णयाबरोबर आम्ही जाऊ, असेही आझाद यावेळी म्हणाले.
याआधी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या तर पंतप्रधानपदाचा विचार करेन, असे म्हटले होते. मात्र, आता गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे काँग्रेसने पंतप्रधानपदाचा हट्ट सोडला का? अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.