नवी दिल्ली - राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून आठवड्याभरात नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल असे संकेत दिले आहेत. सध्या ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांची अध्यक्षपदी हंगामी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या राजीनाम्यावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी ‘मुबारक हो’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
'‘मुबारक हो' आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याबद्दल राहुल गांधीचे अभिनंदन. राहुल हे तरुण आहेत. भविष्यात ते पुन्हा अध्यक्ष होऊ शकतात. त्यांना या पदावर दुसऱ्या व्यक्तीची गरज होती. निवडणुकीतल्या पराभवामुळे त्यांनी पद सोडले असे म्हणता येणार नाही. आता पक्षबांधणीसाठी ते काम करतील अशी अपेक्षा आहे,’ असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी राजीनामा देऊ नये अशी काँग्रेसच्या नेते, पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मी आधीच राजीनामा दिला असून आता काँग्रेसचा अध्यक्ष नाही. कार्यकारी समितीने लवकरात लवकर नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
राहुल गांधी यांची २०१७ साली काँग्रेस अध्यक्षपदावर निवड झाली होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन २५ मे रोजीच्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ५२ जागा जिंकता आल्या. २०१४ च्या तुलनेत काँग्रेसच्या फक्त आठ जागा वाढल्या.