हैदराबाद : चरित्र्याच्या संशयावरुन आपल्या पत्नीची हत्या करत, तिचे शिर धडावेगळे केल्याचा धक्कादायक प्रकार तेलंगणामध्ये समोर आला आहे. राज्याच्या संगारेड्डी जिल्ह्यात बुधवारी रात्री ही घटना घडली. आरोपीने यानंतर पोलिसांकडे जात आपल्या गुन्ह्याबाबत स्वतःच माहिती दिली. जुर्रु सैलू असे या आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जुर्रु सैलू याचे आपली पत्नी अमशम्माशी वारंवार वाद होत होते. सैलू आपल्या पत्नीच्या चरित्रावर संशय घेत होता. तिच्या एका मित्रासोबत तिचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत जुर्रू तिला मारहाणही करायचा. बुधवारी रात्रीही दोघांमध्ये याच कारणावरुन भांडण झाले, ज्यामध्ये रागात सैलूने आपल्या पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालत हत्या केली.
शिर धडावेगळे करुन नेले मित्राच्या घरी..
हत्या केल्यानंतरही सैलूचा राग शांत न झाल्यामुळे, त्याने तिचे शिर धडावेगळे केले. ते एका पिशवीत टाकून त्याने पाच किलोमीटर दूर असलेल्या नारायणखेडमध्ये नेत, तिच्या मित्राच्या घरासमोर ठेवले. रस्त्यातच त्याने तिचा मृतदेहही झुडुपांमध्ये फेकून दिला होता.
यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जात, स्वतःच आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा : भाजपच्या नेत्याने गोळ्या घालून पोलिसांसमोर ४६ वर्षीय व्यक्तीला केले ठार