श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या प्रशासनाने शुक्रवारी पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांनी वाढ केली आहे जन सुरक्षा कायद्यांतर्गत ही वाढ करण्यात आली आहे.
मुफ्ती यांना मागील वर्षी पाच ऑगस्टपासून त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवण्यात आले होते. या दिवशी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 रद्द करण्यात आले होते. यानंतर शेकडो लोकांना सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या विविध नेत्यांचाही समावेश होता.
मुफ्ती यांच्या नजर कैदेची मुदत येत्या पाच ऑगस्टला संपत होती. आता ही मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली आहे.
गृह खात्याने जारी केलेल्या आदेशानुसार मुफ्ती यांना त्यांचे अधिकृत निवासस्थान ‘फेअरव्ह्यू बंगलो’ येथे आणखी तीन महिने नजर कैदेत राहावे लागणार आहे. त्यांना तुरुंगाऐवजी घरीच नजर कैदेत ठेवण्याची सवलत (subsidiary jail) मिळाली आहे.
'कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थांनी मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ करण्याचे सुचवले होते. सध्याची परिस्थिती पाहता ही बाब आवश्यक समजण्यात येत आहे,' असे गृह खात्याच्या आदेशात म्हटले आहे.
मागील वर्षी पाच ऑगस्टला नजर कैदेत किंवा अटकेत ठेवण्यात आलेल्या बहुतेक मुख्य प्रवाहातील नेत्यांची सुटका झाली आहे. यात फारुक अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे.