नवी दिल्ली - अरबी समुद्रात आग्नेय आणि आजूबाजूच्या मध्यपूर्व अरबी समुद्राच्या भागात, लक्षद्वीप बेटांजवळ कमी दाबाच्या हवेचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे या भागांमध्ये चक्राकार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली आहे.
हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण होणाऱ्या हालचालींमुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील, असे मतही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सुरक्षितेसाठी मच्छिमारांनी पुढील ४८ तासांमध्ये म्हणजे ११ व १२ जून रोजी अरबी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय ११ व १२ जून दरम्यान राज्याच्या किनारपट्टीपासून हे चक्रीवादळ सुमारे ३०० किलोमीटर दूर राहील, असे सांगण्यात आले आहे. हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, मात्र त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या काळात चक्रीवादळाच्या टप्प्यात असलेला व किनारपट्टीजवळ असलेला समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.