तिरुअनंतपुरम - केरळ राज्यामध्ये पुराने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत पुरामध्ये ४४ जणांचा बळी गेला आहे. ८ जिल्ह्यांना "रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तर ६ जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे काम आपत्ती निवारण पथक करत आहे.
पल्लकड, इदुक्की, कसरगोड, कुन्नुर, वायनाड, कोझिकोड, मल्लापुरम, एर्नाकुलम जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टचा देण्यात आला आहे. या आठही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. कोची विमानतळ पाण्यामध्ये गेले आहे, त्यामुळे हवाई दलाचे विमानतळ नागरी उड्डाणासाठी वापरण्यात येत आहे.
केरळमधील बनासुरा सागर धरणाचे दरवाजे आज ३ वाजता उघडण्यात येणार आहेत. पल्लकड अप्पर भवानी धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत. पावसामुळे १८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. धरण परिसरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राहुल गांधी वायनाड आणि एर्नाकुलम जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची उद्या (रविवारी) पाहणी करणार आहेत.