मुंबई - रिलायन्सच्या अनिल अंबानींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या राफेलवरील आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. राफेल करार होण्यापूर्वी १० दिवसांआधीच अनिल अंबानींना या कराराची माहिती होती, हा राहुल गांधींचा आरोप बनवाबनवीचा आहे. गांधींनी केलेले सर्व दावे तथ्यांना डावलून केले गेल्याचा उलट आरोप रिलायन्सने यावेळी केला.
रिलायन्स कंपनीने स्पष्टीकरण देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दाखवलेले ईमेल्स हे मेक इन इंडिया अंतर्गत एअरबस आणि रिलायन्समध्ये झालेल्या हेलिकॉप्टरच्या करारासंदर्भात असल्याचा खुलासा केला आहे. या ईमेल्सचा फ्रान्स आणि भारत सरकारदरम्यान झालेल्या ३६ राफेल विमानांच्या कराराशी काही संबंध नसल्याचे रिलायन्सने म्हटले आहे.
अनिल अंबानींनी राफेल करार होणाच्या १० दिवस अगोदरच फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांना भेटून या करारात माझे नाव असल्याचे सांगितले होते. याचा पुरावा म्हणून राहुल गांधींनी पत्रकार परिषदेतच एअरबस कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या ईमेलची प्रत सर्वांसमोर सादर केली होती. नरेंद्र मोदी गुप्तहेरांचे काम करत देशाची गुप्त माहिती अंबानींना पुरवत होते. या करारासाठी मोदींनी अंबानींचे 'मिडलमॅन' म्हणून काम केल्याचा घणाघाती आरोपही राहुल गांधींना या पत्रकार परिषदेत केला होता.