फरक्का - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी करण्यात आली. तर, प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे या लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवणय्यात आला. याचा परिणाम हा देशभरात रोजगासासाठी निघालेल्या स्थलांतरित कामगार, मजुरवर्गावर झाला. अनेक स्थलांतरितांनी घराकडे पायी वाटचाल सुरू केली. कोलकातामध्ये कामासाठी गेलेल्या १९ स्थलांतरीतांनीही अपल्या घराकडे पायी चालत बिहारच्या बरसोई भागात असलेले घर गाठण्याचा निर्णय घेतला. आज ते लोकं फरक्का येथे पोहोचले आहे.
याबाबत सांगताना एक मजुर म्हणाला, 'लॉकडाऊन वाढल्याने आणि महानगरातील सियालदा भागातील स्टीलवर्क बंद झाल्याने त्यांना परत येण्याशिवाय पर्याय नव्हता. 'पैसे, अन्न आणि कोणतीही नोकरी नसल्यास आम्ही कोलकातामध्ये टिकू शकणार नाही. आम्हाला घरी परत यावं लागलं. कोणतीही वाहतूक उपलब्ध नसल्याने आम्ही चालण्याचे ठरविले,' अशाप्रकारे त्यांनी ९६ तास पायी चालत तब्बल २९२ किमीचे अंतर पार करत आज फरक्का गाठले. तर, बरसोईपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना जवळपास ४१९ किमीचे अंतर पायी तुडवावे लागणार आहे.
तर, इतर एकाजण याबाबत सांगताना, 'आमच्याकडे काही बचत होती, मात्र, लॉकडाऊनमुळे ती आठवड्याभरातच संपली. आम्ही ज्या कारखान्यात काम करत होतो, त्या कंपनीच्या मालकाकडूनही आम्हाला जास्त मदत मिळाली नाही. त्यामुळे, आम्ही पायीच घरी परत जाण्याचा निर्णय घेतला मात्र, धाडस होत नव्हते. त्यामुळे आम्ही काही दिवस तेथेच थांबलो. मात्र, पैसे संपले आणि खायला काही नसल्याने शेवटी आम्ही घरी चालत जायला निघालो, असे म्हणाला.
'आम्ही पायी चालायला सुरुवात केली. मात्र, रस्त्यात कुणी अडवेल अशी सतत भीती वाटत होती. परंतु, आमचा आत्तापर्यंत अनुभव चांगला राहिला. आम्हाला रस्त्यात भेटलेल्या काही रहिवाशांनी तसेच पोलिसांनी बर्याच ठिकाणी रोखले पण कोणीही आम्हाला त्रास दिला नाही. त्यापैकी काहींनी आम्हाला अन्न आणि पैशाची मदत केली. आता आम्हाला फक्त घरी पोहोचायचे आहे,' असे तो पुढे बोलताना म्हणाला.
देशभरात लॉकडाऊनमुळे कामकाज बंद पडले आहे.यामुळे बर्याच स्थलांतरित कामगारांचा रोजगार हिरावला तर, काहिंना मजुरी दिली गेली नाही. त्यामुळे, हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही अशा कठीण परिस्थितीत अनेक कामगार, मजुरांनी पायदळी घराकडची वाट तुडवायला सुरुवात केली आणि ती अजूनही सुरुच आहे.