जयपूर - जगभरात पसरत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघनेचे एक पथक राजस्थानमध्ये दाखल होणार आहे. राज्याच्या टोंक जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणासाठी हे पथक दाखल होणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी दिली आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये राजस्थानमधील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शुक्रवारी वाढलेल्या रुग्णांमध्ये टोंक जिल्हयामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. ही परिस्थिती पाहून, जागतिक आरोग्य संस्थेचे (डब्ल्यूएचओ) एक वैद्यकीय पथक जिल्ह्यामध्ये येऊन तपासणी आणि सर्वेक्षण करेल. अशा आशयाचे ट्विट पायलट यांनी केले.
या विषाणूचा प्रसार थांबवणे यालाच आम्ही सध्या प्राधान्य देत आहोत. त्यामुळे जागतिक आरोग्य संस्थेने सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन आम्ही करत आहोत. आपण जर जबाबदारीने वागलो, तरच आपण या विषाणूला हरवू शकतो, असेही ते म्हणाले.
राजस्थानमध्ये शुक्रवारपर्यंत कोरोनाचे १५४ रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी १६ रुग्ण हे टोंक जिल्ह्यातील आहेत. शुक्रवारी एकाच दिवसात राजस्थानमध्ये २१ नवे रुग्ण आढळून आले, ज्यांपैकी १२ टोंकमधून होते. या १२ पैकी चार रुग्ण दिल्लीच्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजर होते. तर जिल्ह्यातील इतर १२ रुग्ण हे त्यांच्याच संपर्कातील व्यक्ती असल्याचे समोर आले आहे.
राजस्थानमध्ये सर्वाधिक रुग्ण जयपूर जिल्ह्यामध्ये (४८) आढळून आले आहेत.
हेही वाचा : कोरोनाशी लढा देण्यात केरळच्या परिचारिकांचा मोलाचा वाटा..