रायपूर - देशभरामध्ये आज ७४ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. लाल किल्ल्यापासून ते दुर्गम गावातील शाळेत आणि सरकारी कार्यालयात झेंडावंदन झाले. मात्र, देशातील काही भागात अजूनही स्वांतत्र्य दिन साजरा करण्यात अडचणी येतात. छत्तीगडमधील दंतेवाडा या नक्षली प्रभाव असलेल्या जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावात नक्षलवादी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतात. मात्र, यावर्षी एका गावाने नक्षलवाद्यांना न जुमानता स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.
जिल्ह्यातील काटेकल्यान विभागातील मरजूम या गावात नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे मागील २० वर्षांपासून स्वांतत्र्य दिन साजरा करण्यात आला नव्हता. मात्र, यावर्षी स्थानिक नागरिकांनी हिंमत करून सुरक्षा दलाच्या जवानांच्या उपस्थितीत भर पावसात स्वातंत्र्य दिन साजरा केला. नागरिक आणि शालेय विद्यार्थी छत्र्या घेऊन घराबाहेर पडले होते.
मागील अनेक वर्षांपासून दंतेवाडामधील दुर्गम भागात नक्षलवादी स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवावर बहिष्कार टाकत आले आहेत. निषेध म्हणून काळा झेंडाही फडकावतात. तसेच कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नागरिकांना करतात. मात्र, यावर्षी ३०० गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांची दहशत असूनही हिंमत दाखवत स्वातंत्र्य दिन साजरा केला. या कार्यक्रमाला सुरक्षा दलाचे कमांडोही उपस्थित होते. विशेष म्हणजे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
छत्तीसगड पोलिसांनी दीड महिन्यांपूर्वी 'लोन वरातू' ही मोहीम राबविली आहे. लोन वरातू म्हणजे 'गावात माघारी या'. या मोहिमेद्वारे नक्षलवाद्यांना चळवळ सोडून मुख्य प्रवाहात माघारी येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी २० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी दंतेवाडात आत्मसमर्पण केले. या अभियानात पोलिसांना यश मिळत असून आतापर्यंत १०२ नक्षलवाद्यांनी या अभियानांतर्गत आत्मसमर्पण केले आहे.