लखनऊ - उत्तर प्रदेशात मंगळवारी विविध ठिकाणी वीज कोसळून झालेल्या अपघातांमध्ये १३ लोकांचा मृत्यू झाला. गाझीपूर, कौशांबी, चित्रकूट आणि इतर काही ठिकाणी वीज कोसळून हे अपघात झाले. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची नोंद घेतली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्याचे आदेश त्यांनी संबंधित जिल्ह्यांच्या दंडाधिकाऱ्यांना दिले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गाझीपूरमध्ये चार, कौशंबीमध्ये तीन, खुशीनगर आणि चित्रकूटमध्ये प्रत्येकी दोन तसेच जौनपूर आणि चंडौलीमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सध्या पुरानेही थैमान घातले आहे. लख्मीपूर खेरी, सीतापूर आणि आझमगड जिल्ह्यांमधील सुमारे २८ गावांना पुराचा फटका बसला आहे. आदित्यनाथ यांनी राज्यातील पुराचाही आढावा घेतला. पुरामध्ये किंवा वीज कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये जखमींनाही तातडीने आणि योग्य उपचार देण्यात यावेत असे निर्देश त्यांनी दिले.
यापूर्वी जूनमध्ये उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी वीज कोसळून २४ जणांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा : नेपाळमधील काठमांडूच्या पूर्वेस 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप