मुंबईVijay Vadettiwar :मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला असून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई साफ करण्याचं काम शिंदे सरकार करत आहे. सरकारच्या आशीर्वादामुळं अनेक वादग्रस्त अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. मुंबई महापालिकेतील आयुक्तांच्या बदली संदर्भात निवडणूक आयोगानं दोनदा पत्र देऊन देखील सरकार त्यांची बदली करत नसल्याचं सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. या अधिकाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राच्या माध्यमातून केली असल्याचं त्यांनी आज (6 मार्च) पत्रकार परिषदेत सांगितलं.
तीन वर्ष झाले तरी बदल्या नाहीत :राज्य विधिमंडळाच्या अंतरीम अर्थसंकल्पात देखील विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून सरकारला धारेवर धरलं होतं. "मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांची बदली होत नाही. तसंच अश्विनी भिडे, वेलारासू हे वरिष्ठ सनदी अधिकारी देखील आपल्या जागेवर ठाण मांडून आहेत. तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील यांच्या बदल्या होत नाहीत. अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे 'आयएएस' नसताना देखील त्यांना मोठ्या पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. मुंबई महापालिका विकास निधी वाटपात दुजाभाव केला गेला. हे अधिकारी सरकारच्या मर्जीतले असल्यामुळं ते पक्षपातीपणा करू शकतात. त्यामुळे या अधिकाऱ्यांची लवकरात लवकर हकालपट्टी करून दुसऱ्या ठिकाणी बदली करावी अशी विनंती आयोगाकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे," असं वडेट्टीवार म्हणाले.