मुंबई :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असतील? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मुख्यमंत्री पदावर शिंदे पक्ष आपला दावा करत असतानाच या शर्यतीत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत पोहोचले. महाराष्ट्र भाजपाचे अनेक बडे नेतेही त्यांच्यासोबत दिल्लीत उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका हॉटेलमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली. मात्र, या लग्नसराईत मुख्यमंत्री पदाबाबत काही चर्चा झाली का? हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
संग्रहित छायाचित्र (Reporter) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार मुंबईत :नव्या सरकारच्या स्थापनेबाबत आणि मुख्यमंत्री पदावर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्रातील भाजपाच्या बड्या नेत्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत येऊन अमित शाह पुढच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची घोषणा करतील, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.
एकनाथ शिंदेच राहावेत मुख्यमंत्री :एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री पदावर राहावे, शिवसेनेच्या या आग्रहामुळे महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होण्यास विलंब होत असल्याची चर्चा केली जात आहे. बिहार मॉडेलचा दाखला देत शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवावं, अशी मागणी केली आहे. तर, दुसरीकडं मंत्री दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याची विनंतीएकनाथ शिंदे यांना केल्याचं केसरकरांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानं शिंदे यांनी या पदावर कायम राहावं, असं शिवसेनेच्या आमदारांचं मत असल्याचं दीपक केसरकर म्हणाले.
एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता :राज्याच्या चौदाव्या विधानसभेची मुदत आज संपत आहे. दुसरीकडं विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीनं जोरदार मुसंडी मारत ऐतिहासिक विजय संपादन केला. त्यामुळे अमित शाह हे मुंबईत येऊन मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा करणार आहेत. त्यापूर्वी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडं सुपूर्द करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
- "इंदिरा गांधी परत आल्या तरी....," कलम 370 वरुन अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
- भाजपा राष्ट्रवादीतील बोलणीसाठी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानींची बैठक; अजित पवारांचा गौप्यस्फोट, विरोधकांचा हल्लाबोल
- "घड्याळ नको, कमळ आणा"; अमित शाहांचा चक्क राष्ट्रवादीविरोधात प्रचार, पाच मिनिटांत उरकलं भाषण