नवी मुंबई Woman Suicide Attempt Atal Setu : प्रवास सुखकर आणि जलद होण्यासाठी मुंबईत अटल सेतू तयार करण्यात आला. या सेतूवर कुठेही गाडी थांबवण्याची परवानगी नाही. तरीसुद्धा काही प्रवासी येथे गाडी थांबवतात. तसंच अनुचित प्रकारही या सेतूवर घडताना दिसत आहेत. या सेतूवरुन एक महिला आत्महत्येचा प्रयत्न करत असताना तिला वाहतूक पोलीस आणि कॅब चालकानं वाचवलं आहे.
अटल सेतूवरुन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न (Source : Nhava Sheva Police Station) महिलेचे वाचवले प्राण :मुंबईवरून नवी मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या रस्त्यावर अटल सेतूवरुन (Atal Setu Bridge) उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५६ वर्षीय महिलेला वाचवण्यात पोलिसांना यश आलं. "मी आत्महत्या करत नव्हते तर देवांचे फोटो समुद्रात फेकत होते," असं या संबंधित महिलेनं पोलिसांना सांगितलं. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता घडली.
काय घडलं नेमकं? : अटल सेतूवरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला न्हावा शेवा वाहतूक पोलीस कर्मचारी आणि कॅब चालकानं वाचवलं. संबधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. रिमा पटेल (वय-५६) असं संबंधित महिलेचं नाव आहे. त्यांनी मुलुंड येथून कॅब बुक केली आणि त्या कॅबमधून सेतू येथे आल्या होत्या. त्यांनी चालकाला कॅब थांबवण्यासाठी सांगितलं आणि कॅबमधून उतरून त्या अटल सेतूच्या रेलिंगवर चढल्या. त्याचवेळी न्हावा शेवा वाहतुक पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन अटल सेतूवर गस्त घालत होती.
कॅब चालकानं धरले महिलेचे केस : एक महिला अटल सेतूच्या रेलिंगवर उभी असल्याचं पोलिसांना दिसली. शेलार टोल नाक्यावर असणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांनी देखील या संदर्भात पोलीस पथकाला माहिती दिली. तसंच कॅब चालक संजय द्वारका यादव (वय-३१) हे महिलेचे केस धरून वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याचवेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. "वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ, किरण म्हात्रे, यश सोनवणे, मयूर पाटील या चौघांनी महिलेचे प्राण वाचवले," असं न्हावा शेवा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गुलफरोज मुजावर यांनी सांगितलं.
पोलिसांना दिला जबाब :संबंधित महिलेनं पोलिसांना जबाब दिला आहे. "मी देवांचे फोटो समुद्रात विसर्जन करण्यासाठी सेतूवर आले होते," असं तिनं पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं. संबधित महिला कॅबमधून खाली उतरली आणि रेलिंगवर चढली. यानंतर ती खाली उडी घेत असतानाच कॅब चालकानं तिचे केस पकडले आणि वर ओढले. त्याचवेळी पोलीस तिथे दाखल झाले. हे सर्व सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्यामुळं आत्महत्या करण्याचा प्रयत्न होता की तिचा तोल गेला हे अधिकृतपण समजू शकले नाही.
हेही वाचा -
- "नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे सरदार"; अटल सेतू कामाच्या दर्जावरुन नाना पटोलेंची टीका, सेतूची केली पाहणी - Nana Patole on Atal Setu
- मुंबईकरांसाठी मोठं गिफ्ट; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'अटल सेतू'चं उद्घाटन
- देशातील सर्वात मोठ्या 'अटल सेतू सागरी' प्रकल्पाचं होणार लोकार्पण; का आहे खास? जाणून घ्या सविस्तर