मुंबईLOK SABHA ELECTIONS :लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळं सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील सर्वच नेते कामाला लागेल आहे. राज्यातील महायुती तसंच महाविकास आघाडीतील काही उमेदवारांची नावे जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून नाना पटोले यांना लोकसभा उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं नाना पटोले यांना इकडे आड तिकडे विहीर अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
पक्षाचा शिपाई : यावर्षी 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून धक्का तंत्राचा वापर केला जात आहे. बहुतेक विद्यमान आमदारांना काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून काल प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील विद्यमान आमदारांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. गोंदिया भंडारा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र नाना पटोले लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याची सूत्रांकडनं माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले आहे की, मी पक्षाचा शिपाई असून, पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यासं त्याचं पालन करावं लागेल, असं नाना पटोले म्हणाले. त्यामुळं ते लोकसभा निवडणूक लढणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
नाना पटोले यांना लोकसभेची उमेदवारी? :भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून नाना पटोले यांना लढण्यास सांगितलं जाऊ शकतं. मात्र, ते लोकसभा निवडणुकीसाठी फारसे उत्सुक दिसत नाहीत. आगामी काळामध्ये राज्यात महाविकास आघाडीच सरकार आलं, तर नाना पटोले यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यास त्यांना नैतिकतेच्या आधारे पदाचा राजीनामा द्यावा लागेल. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाल्यास केंद्रात पक्षाकडून नाना पटोले यांना मोठी जबाबदारी मिळू शकते. तर, दुसरीकडं यामुळं त्यांचा राज्यातील पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नाना पटोले द्विधा मनस्थितीत असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षांतर्गत गटबाजी अनेकवेळा चव्हाट्यावर आली होती. सध्या काँग्रेस पक्षातील बडे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यामुळं कुठेतरी पक्षांतर्गत गटबाजी शमण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जात असल्याच बोललं जात आहे.