पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून विविध गुन्ह्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच बलात्कार केल्यानं राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा फरार असून त्याच्यावर 1 लाख रुपयांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलं आहे. दत्ता गाडेनं या तरुणीवर बसमध्ये दोनदा बलात्कार केल्याचं तिच्या वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झालं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे आरोपी दत्ता गाडे इतर प्रकरणात जामिनावर बाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नराधम दत्ता गाडेवर 1 लाखाचं बक्षीस जाहीर :याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या की, "13 पथकांकडून आरोपी दत्ता गाडेचा शोध सुरू आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टँडच्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जात आहे. त्याच्या कुटुंबीयातील अनेकांची बुधवारी चौकशी करण्यात आली आहे. आरोपीला पकडण्यासाठी 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांची सुद्धा बुधवारी भेट घेतली. तसंच पीडित तरुणीचा मेडिकल अहवाल प्राप्त झाला आहे. पण त्यावर बोलणं उचित नाही," असं यावेळी त्यांनी सांगितलं.