ठाणे Shahapur District Hospital: शहापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरकडून धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका १४ वर्षाच्या मुलाचं दुखणं पायाचं होतं. मात्र येथील डॉक्टरांनी त्याच्या गुप्तांगावरच शस्त्रक्रिया (Genital Surgery) करून त्याला गंभीर दुखापत केल्याचा आरोप पालकांनी केलाय. शहापूर तालुक्यातील सावरोलीच्या 14 वर्षीय मुलाच्या बाबतीत हा प्रकार घडलाय.
मुलाच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया :मुलाच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मुलाच्या तळपायाला जखम झाली होती. त्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी उपचारासाठी त्याला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर त्याच्या पायाचे एक्स-रे काढण्यात आले. सर्व रिपोर्ट चेक केल्यानंतर डॉक्टरांनी त्याचा आई-वडिलांना सांगितलं की, मुलाच्या पायाचं ऑपरेशन करावं लागेल. दुसऱ्या दिवशी त्याच्या पायाच्या ऑपरेशनची तयारी करण्यात आली होती. त्यानंतर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात या मुलाचं ऑपरेशन करण्याअगोदर दोन मुलांच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर या मुलाला डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि त्याच्याही गुप्तांगावर शस्त्रक्रिया केली.
डॉक्टरांचा निष्काळजीपणा? :ऑपरेशन झाल्यानंतर त्याला बाहेर वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि तेथे त्याच्या आईनं त्याला बघितल्यानंतर तिच्या लक्षात आलं की, आपल्या मुलाच्या पायाचं ऑपरेशन करण्यासाठी घेऊन गेले होते. मात्र, पायाचं ऑपरेशन केलंच नसून त्याच्या गुप्तांगाचं ऑपरेशन केलं आहे. तर दुसरीकडं त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नसताना त्याच्या गुप्तांगाचं ऑपरेशन का केलं? असा प्रश्न पालकांनी विचारला. मुलाच्या आईनं हॉस्पिटलमध्ये आरडा ओरड केल्यानंतर डॉक्टरांच्या सर्व प्रकार लक्षात आला. त्याला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले आणि जखम झालेल्या डाव्या पायाचं ऑपरेशन केलं. एकंदरीतच शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाल्याचं या प्रकरणावरुन झाल्याचा दावा करण्यात येत आहे.