महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच नागरिक त्रस्त; तीन वर्षापासून 50 कुटुंब अंधारातच जगतायेत

Purna Village Electricity Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील पूर्णा या गावी 'साई जिवधारा कॉम्प्लेक्स'मध्ये मागील तीन वर्षांपासून अंधारच आहे. अनेकवेळा नागरिकांनी बिल्डर, खासदार, वीज कंपनी यांची दार ठोठवली. मात्र, आणखी कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 9:19 AM IST

माहिती देताना बिल्डर आणि नागरिक

ठाणे Purna Village Electricity Crisis : शहरी भागात थोडावेळ वीज गेली तरी नागरिकांचा मोठा संताप होतो. परंतु, गेली तीन वर्ष गावातील एका सोसायटीमध्ये अखंड अंधारच आहे. रोज रात्री जनरेटर लावून काही तासांत आपलं काम आणि जेवण उरकून झोपावं लागतय अशी इथली स्थिती. हे सगळं ऐकून आजही असे दिवस सहन करणारे लोक आणि तशी अवस्था कायम ठेवणारं सरकार आहे यावर आपला विश्वास बसणार नाही. तीन वर्षांपासून 50 कुटुंबं या प्रकारच्या अवस्थेत राहत आहेत. हे कुटुंब आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील. खासगी वीज कंपनीनं वीज उपलब्ध करून देऊ असं अनेकदा अश्वासन दिलं. मात्र, आजपर्यंत या कुटुंबाच्या नशिबात काही प्रकाश पडला नाही.

तीन वर्षापासून अंधार : मोठा काळोख, सर्वत्र उगवलेली झाडी-झूडपं अशी इथं स्थिती आहे. या झाडा-झुडपांमुळे कित्येकदा साप, विंचू असे विषारी प्राणीही इथ आढळतात. ही स्थिती काही एखाद्या खेड्यातील नाही. ही स्थिती ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पूर्णा गावातील आहे. इथल्या 'साई जिवधारा कॉम्प्लेक्स'मध्ये जवळपास 50 कुटुंबं, गेली तीन वर्षे अशाच वाईट अवस्थेत राहत आहेत. आपलं स्वतःचं छोटंसं घर असावं आणि त्याला आपण हौशेने सजवावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्याच अपेक्षेने अनेक कुटुंबांनी येथील साई जिवधारा कॉम्प्लेक्समध्ये घरं घेतली. अतिशय कमी किमतीत वीज आणि मुबलक पाणी उपलब्ध असलेली घरं घेऊन सगळे खूश झाले होते. मात्र, इथ वीज काही उपलब्ध झाली नाही. येथील नागरिकांना अंधारातचं दिवस काढावे लागत आहेत.

कंपनीचा प्रतिसाद मिळाला नाही : अकरा इमारतींच्या या कॉम्प्लेक्समधील पाच इमारती पूर्ण झाल्यानं इथं 50 कुटुंबं राहू लागले. दोन ते अडीच वर्षे चांगली गेल्यानंतर सध्या इथं वीज नाही. 'टोरेंट' वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीने अचानक या इमारतींचा वीज पुरवठा खंडित करून त्यांना अंधाराच्या खाईत लोटलं, असा आरोप येथील रहिवाशांचा आहे. या कॉम्प्लेक्सचे मालक आणि स्वतः रहिवाशांनी अनेकदा वीज कंपनीशी संपर्क साधून वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली. परंतु, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. गेली तीन वर्षे हे सर्व कुटुंब अशाप्रकारे अंधारात आहेत. घरातील पुरुष मंडळी तरी दिवसा कामावर जातात. परंतु, लहान मुलं, घरातील महिला, अपंग व्यक्ती आणि वयोवृद्ध नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण दिवस वीज नसल्यानं प्रचंड उकाड्यात दिवस काढावे लागत आहेत, अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली.

या संपूर्ण परिसराची वीज पुरवठा करण्याची जबाबदारी ही खासगी वीज वितरण कंपनी टोरंटो यांची आहे. वीज पुरवठा खंडित होण्याआधी देखील टोरंटो या ठिकाणी वीज पुरवठा देत होती. मात्र, बिल आणि इतर कारणं देत टोरंटोने वीज मीटर काढून घेतले. आता मागील तीन वर्षांपासून ''एमएमआरडीए''च्या प्रशासनाकडून आलेलं पत्र देखील मिळालं. मात्र, टोरेंटोकडून आम्ही वीजपुरवठा लवकर करत आहोत असे अश्वासन देण्यात येत आहे. या संदर्भात जेव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी देखील आम्ही लवकरच वीज पुरवठा करणार आहोत. -बिल्डर

वर्गणी करून घेतात डिझेल : या घटनेवर तोडगा म्हणून अखेर मालकांनी त्यांना एक जुना जनरेटर आणून दिला. त्यानंतर सर्वांनी पैसे गोळा करून डिझेल भरायचं आणि जनरेटर चालवायचं असं ठरलं. जनरेटर चालवण्याची माहिती असलेले कॉम्प्लेक्समधील नागरिक रोज रात्री कामावरून येऊन लगेच डिझेल आणण्यासाठी बाहेर पडतात. डिझेल टाकून जनरेटर सुरू करण्यास रात्रीचे अकरा वाजून जातात व त्यानंतर वीज सुरू होते. ती वीजही काही तासच टिकते. याविषयी टोरेंट कंपनी आणि स्थानिक खासदारांकडं अनेकदा पाठपुरावा करून देखील आपल्याला कोणताच न्याय मिळाला नसल्याची खंत रहिवासी व्यक्त करतात.

हेही वाचा :

190 वर्षांचा इतिहास अभिमानाने मिरवणारे चर्चगेट येथील इरॉस सिनेमागृह, 7 वर्षांनी नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला

2मॉरिसनं गोळीबारात वापरलेली बंदुक अंगरक्षकाच्या नावावर, मॉरिसवर यापूर्वी तीन गुन्हे दाखल

3राज्यातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, नाना पटोले यांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details