सांगली : कवलापूरजवळील कुमठे फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात आईसह दोन मुलं जागीच ठार झालेत. तर सबंधित महिलेचा पती गंभीर जखमी असून त्यांच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकी आणि वडाप जीप यांच्यात हा भीषण अपघात झाला. दिपाली म्हारगुडे (वय- 28 वर्ष), सार्थक म्हारगुडे (वय- 7 वर्ष), राजकुमार म्हारगुडे (वय- 5वर्ष) अशी मृतांची नाव असून विशाल म्हारगुडे (वय- 30 वर्ष) हे जखमी झाले आहेत.
तीनजण जागीच ठार :तासगाव-सांगली मार्गावरील कवलापूरजवळील कुमठे फाटा या ठिकाणी सकाळच्या सुमारास भरधाव वडाप जीप आणि दुचाकीचा अपघात झाला. विश्वास म्हारगुडे हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह आपल्या दुचाकीवरून सांगलीहुन तळेवाडी या ठिकाणी एका लग्न सोहळ्यासाठी निघाले होते. ते कुमठे फाटा येथील पेट्रोलपंपासमोर आले असता समोरून भरधाव वेगानं येणार्या वडाप जीपनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, आईसह दोन मुलं जागीच ठार झाले. विश्वास मारुगडे यांच्या डोक्यावर हेल्मेट असल्यानं त्या अपघातात बचावले. मात्र ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.