ठाणे : अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसी परिसरातील रेसिनो ड्रग्ज कंपनीत रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण स्फोट झाल्यानं खळबळ उडाली. या स्फोटानंतर काही क्षणातच आग पसरून कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीमुळे आजूबाजूच्या कंपनींना झळ पोहोचून चार कंपन्यांना आग लागली आहे. या आगीत कंपनीतील प्लांट ऑपरेटर अनिल यादव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ड्रग्ज कंपनीत भीषण स्फोट (Reporter) ड्रग्ज कंपनीत भीषण स्फोट :मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ शहरातील आनंदनगर भागात एमआयडीसी असून या एमएसडीसीमध्ये रेसिनो ड्रग्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीत विविध औषध तयार केली जातात. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीत रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास रसायनामुळे आग लागल्यानं कंपनीतील प्लांटमध्ये स्फोट झाला. त्यानंतर या कंपनीतून केमिकल बाहेर वाहत येत असल्यानं शेजारच्या कंपन्यांनाही आगीची झळ बसल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. कंपनी बाहेरच्या नाल्यामध्ये रसायन पसरल्यानं इथंही काही काळ भडका उडाला. त्यामुळे येथे गोंधळाची स्थिती निर्माण होऊन आजूबाजूच्या चार कंपन्यांना आग लागली.
प्लांट ऑपरेटर गंभीर, 10 ते 15 कर्मचारी होते कंपनीत : रविवारी मध्यरात्रीपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं नव्हतं. दुसरीकडं कंपनीत आगीची घटना घडली तेव्हा 10 ते 15 कर्मचारी होते. त्यापैकी प्लांट ऑपरेटर अनिल यादव हे या आगीच्या कचाट्यात होरपळून गंभीर जखमी झाले. मात्र आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसून पाहटे उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवल्याचं सांगण्यात आलं. ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि एमआयडीसीच्या अग्निशनमन दलाच्या जवानांकडून अथक प्रयत्न करत अनेक बंब आणि पाण्याचे टँकर आणून या आगीवर नियंत्रण मिळवलं. सध्या या ठिकाणी कुलिंगचं काम सुरू असून भीषण आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे. तर या आगीत काही वाहनं जळून खाक झाली आहेत. कंपनीच्या बाजूनं जाणारी पाईपलाईन देखील फुटली आहे. मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून कंपनीतील स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा :
- भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग; 60 हून अधिक घरं जळून खाक झाल्याचा अंदाज
- धावत्या रुग्णवाहिकेनं अचानक पेट घेतल्यानं ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, पाहा थरारक व्हिडिओ
- प्लास्टिकच्या वस्तू ठेवलेल्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग, होरपळून तिघांचा मृत्यू