मुंबई:आज संपूर्ण राज्यभर मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. केवळ राज्यच नव्हे तर देश विदेशात असलेला प्रत्येक मराठी माणूस माय मराठीचा गौरव नक्कीच करत असेल. दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या महत्वपूर्ण योगदानाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या जन्म दिनी म्हणजेच जयंतीला हा दिवस साजरा करण्याचा निर्णय २१ जानेवारी २०१३ ला महाराष्ट्र शासनाने घेतला होता. तेव्हापासून मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा केला जातो.
परंतु, दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केल्यानंतर उर्वरीत ३६४ दिवसांचे काय? त्यानंतर मराठी भाषेचा उत्सव कसा साजरा करायचा? मराठी भाषेबाबत कृतज्ञता कशी व्यक्त करायची? पडला ना प्रश्न? असेच प्रश्न २०२२ मध्ये मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं एका कार्यक्रमात आपल्या आजोबासोबत उपस्थित असलेल्या एका बालकाला पडले. त्यानंतर नातवाच्या प्रश्नांनी भारावलेल्या या अवलिया आजोबानं चक्क दर महिण्याच्या २७ तारखेला मराठी भाषा आठव दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या आजोबाचीच ही कहानी.
२०२२ ला आजोबा आणि नातवामध्ये नेमकं काय झालं?
मराठी भाषा गौरव दिना निमित्य राज्यभरात विविध कार्यक्रम ठेवली जातात. अशाच एका कार्यक्रमात रजनीश राणे आपल्या नातवासोबत सहभागी झाले होते. तिथून परतताना त्या नातवानं आपल्या आजोबाल प्रश्न विचारला हा कार्यक्रम झाला आता पुढील कार्यक्रम काय? तेव्हा आजोबा यांच्या मनात आलं की, मराठी भाषा गौरव दिनाप्रमाणे केवळ वर्षभरातून एकदा नव्हे तर दर महिन्याला मराठी भाषा संवर्धनासाठी काहीतरी चांगला कार्यक्रम राबवला गेला पाहिजे. त्यांच्या मनातील या विचारानं मराठी भाषा आठव दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
राणे यांनी यावर बोलताना सांगितले की, कार्यक्रम संपल्यानंतर नातवानं विचारलं हा कार्यक्रम संपला आता पुढे काय कार्यक्रम? त्यातून माझे विचारचक्र सुरु झाले आणि मराठी भाषा आठव दिवस उपक्रम राबवण्याचा विचार पुढं आला. त्यांनी सांगितलं की, त्यांनी मराठी भाषा आठव दिवसाची सुरुवात २७ मार्च २०२२ पासून कोल्हापूर येथून केली. विशेष म्हणजे तेही अमराठी मुलांपासून. ते म्हणाले की, त्यावेळी कोल्हापुरात तीन अमराठी पालक आपल्या मुलांना मराठी शिकवण्यासाठी धडपड करत होते. कारण, महाराष्ट्रात राहण्यासाठी मुलांना मराठी भाषा शिकवावीच लागेल, अशी त्यांच्या पालकांची भूमिका होती. त्या विद्यार्थांना मी शैक्षणिक बाबींसाठी दत्तक घेतलं. त्यानंतर कणकवली, बेळगाव, गोवा, मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी, नालासोपारा, या राज्याच्या विविध भागात कार्यक्रमांचा धडाका सुरु झाला. दोन वर्षांपूर्वी शिवाजी मंदिरात 'मराठी शाळांची तिसरी घंटा वाजवतोय कोण' हा परिसंवाद घेतला होता. 'निर्माते नव्या नाटककारांच्या शोधात' हा परिसंवाद त्यानंतर घेतला. कवी संमेलन, एकल नाट्य महोत्सव असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. यशंवत नाट्यगृह माटुंगा येथे आठ नाटके दाखवली त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, असं त्यांनी सांगितलं.