अहमदनगर Ahmednagar Health Department : जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आरोग्य विभाग अंतर्गत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया शिबिर भरवण्यात आलं होतं. यासाठी अनेक गावातून प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या कार्यक्षेत्रातील गोरगरीब महिला रुग्णांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर नेवासा तालुक्यातील वडाळा येथील FJFM या हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलं. मात्र, रुग्णांची कुठल्याही प्रकारची सोय नसताना तसंच पुरेसे बेड उपलब्ध नसताना देखील आरोग्य यंत्रणेनं फक्त आणि फक्त त्यांच्या केसेस टार्गेटसाठी दीडशेहून अधिक ऑपरेशन केल्याची माहिती उघड झाली.
महिलांना जमिनीवर झोपण्याची वेळ : नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आणला. शनिवारी (20 एप्रिल) मध्यरात्रीचा हा सर्व प्रकार आहे. एकीकडं पाऊस, त्यात लाईट गेलेली आणि अपुरी बेड व्यवस्था यामुळं अनेक महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपण्याची वेळ आल्याचं यातून समोर आलंय.
हॉस्पिटल व्यवस्थापनानं बाजू मांडण्यास दिला नकार : वास्तविक पाहता रुग्णांना पूर्ण सुविधा, बेड तसंच लाईट आणि पाणी सुविधा असेल तरच अॅडमिट करण्यात येतं. परंतु, FJFM हॉस्पिटल येथे अपुरी सुविधा असून, देखील हे हॉस्पिटलच का निवडलं गेलं, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. यात हॉस्पिटल व्यवस्थापनाबरोबर संपर्क साधला असता, त्यांची बाजू सोमवारी (22 एप्रिल) मांडणार असल्याचं त्यांनी सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. तसंच रविवारी सुट्टी असल्यानं शासकीय अधिकारी यांची देखील प्रतिक्रिया मिळू शकली नाही.