नाशिक : आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षित घर देण्यासाठी शासनानं मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागानं 18 डिसेंबर 2024 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गेस्ट हाऊसना 'सेफ होम' म्हणून घोषित केलं आहे. त्यानुसार नाशिकमधील गोल्फ क्लब जवळील गेस्ट हाऊसमधील तपोवन हे अशा प्रकारचं सेफ होम असणार असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. ऑनर किलींगचा धोका असणाऱ्या जोडप्यांना येथे राहण्याची, जेवणाची आणि आवश्यक वस्तुंची सोय होणार आहे. तसंच त्यांना पोलीस संरक्षण पुरवलं जाणार आहे. परिवारास समुपदेशन करण्याची सुद्धा सोय केली जाणार आहे.
हेल्पलाईन नंबर : ऑनर किलींग रोखण्यासाठी 112 हा हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आला आहे. ऑनर किलींग विरोधी काम आणि सेफ होमचा पाठपुरावा करणारे अंनिसच्या जात पंचायत मूठमाती अभियानचे कृष्णा चांदगुडे यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. समाजातील समता आणि सहिष्णुतेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी न्यायालयाचे आणि शासनाचे आभार मानले आहेत.
अंनिस कार्यवाहक कृष्णा चांदगुडे (Source - ETV Bharat Reporter) जोडप्यांना आवाहन : "जर आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केला आणि तुम्हाला सुरक्षित निवासाची आवश्यकता असेल, तर या सेफ होम सुविधेचा लाभ घेता येणार. सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील विशेष कक्ष किंवा स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. हा निर्णय समाजात समतेची भावना रुजवण्यासाठी आणि आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. या निर्णयामुळं अनेक जोडप्यांना त्यांच्या सुरक्षेबाबत असलेल्या भीतीतून मुक्ती मिळेल, त्यांना आपलं जीवन शांततेनं जगता येईल," असं अंनिस पदाधिकारी कृष्णा चांदगुडे यांनी म्हटलं आहे.
सेफ होमसाठी अंनिसची मदत : हरियाणात राज्यात ऑनर किलींगचं प्रमाण कमी करण्यासाठी सेफ होम उभारलं गेलं आहे. अंनिस कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी हरियाणात आठवडाभर फिरुन सेफ होमचा अभ्यास केला. अशा प्रकारची सेफ होम महाराष्ट्रातही व्हावी, अशा प्रकारचा पाठपुरावा सरकारकडे केला. अंनिसनं हजारो आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह लावल्यानं त्यांना या कामाचा अनुभव आहे. समुपदेशन तसंच विविध कामासाठी अंनिस तयार असल्यानं त्यांना प्रक्रियेत सामावून घेण्याची विनंती प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
हेही वाचा
- राम मंदिर निर्मिती झाली म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही- मोहन भागवत
- संतोष देशमुख हत्याप्रकरणात एन्काउन्टर करून मिळवा 51 लाखासंह 5 एकर जमीन, शेतकऱ्यानं का दिली ऑफर?
- सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन