महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेचे खासदार घेणार मोदींची भेट, भेटीमागचे कारण काय?

शिवसेनेचे खासदार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याची माहिती समोर येतेय. मात्र भेट कोणत्या कारणास्तव घेण्यात येणार आहेत? यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2024, 1:20 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीतील निकालाचा कौल जनतेने महायुतीच्या बाजूने दिलाय. महायुतीला निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यामुळे सध्या महायुतीत आनंदाचे वातावरण आहे. 26 नोव्हेंबर रोजी विधानसभेची मुदत संपत आहे, तर दुसरीकडे या आठवड्यात होणारा शपथविधी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, एकीकडे महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असताना आणि मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत एकमत होत नसताना दुसरीकडे आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना महायुतीमध्ये वेग आलाय. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याची माहिती समोर येतेय. मात्र नेमकी ही भेट कोणत्या कारणास्तव घेण्यात येणार आहेत? शिवसेनेचे खासदार पंतप्रधानांना का भेटणार आहेत, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

भेटीमागचं कारण काय? : शिवसेनेचे सात विद्यमान खासदार आणि चार माजी खासदार दिल्लीत मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीच्या कारणावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. महायुतीत शिवसेना नाराज आहे का? किंवा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी दबाव निर्माण करीत आहेत का? असे प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केले जाताहेत. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी भाजपावर अनेक माध्यमातून दबाव आणत आहे का? असंही दबक्या आवाजात बोललं जातंय. दरम्यान, पहिले दोन वर्ष भाजपाच मुख्यमंत्री, पुढील दोन वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि एक वर्ष अजित पवार गटाला मुख्यमंत्रिपद देण्याच्या फॉर्म्युला महायुतीत चर्चा असल्याची मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आलंय. मात्र यावर अद्यापही एकमत झालेलं नाही. शिवसेना पक्षातील कार्यकर्ते आणि नेते मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असून, एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावे, यासाठी हे खासदार पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येतेय. तसेच या सर्व प्रकरणावर आता शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिलीय. एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची इच्छा आहे आणि ती मागणी आहे. शिंदे मुख्यमंत्री व्हावे या जनतेच्या मागणीला दिवसेंदिवस जोर वाढतोय. ही जनतेची इच्छा आमचे खासदार पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्या कानी घालणार आहेत. तसेच खासदारांचे मतदारसंघातील प्रश्न, राज्यातील अनेक विकासकामं, याबाबतही आमचे खासदार पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती "ईटीव्ही भारत"शी बोलताना शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी दिलीय. परंतु अद्यापही पंतप्रधानानी आमच्या खासदारांना वेळ दिलेली नाही. मात्र ते नक्की वेळ देऊन आमच्या खासदार यांच्याशी चर्चा करतील, असा विश्वास शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांना विचारले असता ते म्हणाले, मला याबाबत काहीही माहीत नसून मी अनभिज्ञ आहे.

शपथविधी 1 किंवा 2 डिसेंबरला होणार :23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. यावेळी आम्ही लवकरच शपथ घेऊन सरकार स्थापन करू, असं महायुतीतील नेत्यांनी सांगितलं होतं. मात्र यानंतर बैठकांचा धडाका सुरू असून, शपथविधी कधी होणार हे निश्चित होत नाहीये. तसेच कोणाला किती मंत्रिपदं द्यायची? कुठली खाती द्यायची? यावर सध्या चर्चा असून, त्यामुळे आजच्या आठवड्यात होणारा शपथविधी आता एक किंवा दोन डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर येतेय. दुसरीकडे आज 26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलाय.

शिंदे मोठा निर्णय घेणार...? :महायुतीत एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे बोललं जातंय. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची इच्छा आहे. यासाठी मागील दोन दिवसांपासून लाडक्या बहिणी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण देवाकडे साकडे घालत आहेत. सोमवारी लाडक्या बहिणींनी सिद्धिविनायकचे दर्शन घेऊन पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळावे, यासाठी देवाकडे साकडे घातले, तर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीला ही लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, यासाठी साकडे घातले. सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे ही मागणी जनतेतून जोर धरत आहे. तसेच एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, ही जनतेचीही इच्छा आहे. हे सर्व पाहता महायुतीत एकनाथ शिंदे नाराज असून, एक-दोन दिवसात ते मोठा निर्णय घेणार असल्याचं बोललं जातंय. पण त्यांची भाजपातील दोन वरिष्ठ नेते समजूत काढणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

हेही वाचा-

  1. विधानसभा निवडणूक मुदत संपल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागते का? घटनातज्ज्ञ म्हणतात...
  2. ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेते पदावर दावा? विधिमंडळ सचिवांची घेतली भेट

ABOUT THE AUTHOR

...view details