महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आगामी विधानसभा निवडणुकीत किरीट सोमैया यांची नाराजी महायुतीसाठी ठरू शकते घातक? - Kirit Somaiya displeasure

Kirit Somaiya displeasure - भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून राजकीय रान पेटवणारे किरीट सोमैया यांना भाजपामधूनच धोबीपछाड देण्यात आला. त्यामुळे ते नाराज आहेत. आता तर त्यांनी पत्र लिहून त्यांची नाराजी स्पष्ट केली आहे. सोमैया यांच्या नाराजीचे आगामी विधानसभा निवडणुकीत पडसाद उमटू शकतात.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2024, 3:56 PM IST

मुंबई Kirit Somaiya displeasure -विरोधी पक्षाच्या नेत्यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढून धुरळा उडवून देणारे भाजपा नेते किरीट सोमैया सध्या नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली असून याकरता तयार करण्यात आलेल्या निवडणूक समितीमध्ये किरीट सोमैया यांना निवडणूक संपर्कप्रमुख पद दिल्यानं ते नाराज झाले असून त्यांनी उघडपणे त्यांची नाराजी पत्र लिहून पक्षाला कळवली आहे. एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर किरीट सोमैयांची नाराजी पक्षासाठी घातक ठरू शकते.


पक्षातून डावललं जात असल्याची भावना - लोकसभेत सपाटून मार खाल्लेल्या भाजपानं विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या कारणाने निवडणुकीसाठी व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली असून त्याचं प्रमुख पद माजी केंद्रीय राज्यमंत्री भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर दानवे यांनी किरीट सोमैया यांना निवडणूक संपर्क प्रमुखपदी नियुक्त केलं. परंतु किरीट सोमैया यांनी हे पद नाकारलं असून आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे पक्षाचं काम करत राहू असं त्यांनी पक्षाला पत्र लिहून कळवलं आहे. त्यातच पक्षात त्यांना अवमानास्पद वागणूक दिली जात असल्याचंसुद्धा त्यांनी सांगितलं आहे. किरीट सोमैया यांच्या नाराजीमुळे मागील अनेक वर्षापासून किरीट सोमैया यांना पक्षातून डावललं जात असल्याची भावना त्यांनी यानिमित्ताने बोलून दाखवली आहे.

दोनदा विजय दोनदा पराभव - लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात सपाटून मार खाल्ला. 28 जागा लढवणाऱ्या भाजपाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यांनी केवळ 9 जागा जिंकल्या. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेसोबत एकसंघ असताना भाजपाने २५ जागा लढवून २३ जागी विजय संपादन केला होता. परंतु यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपाची बरीच पिछेहाट झाली. त्यातून सावरत आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं कंबर कसली असताना किरीट सोमैया यांची नाराजी पक्षासाठी हानिकारक ठरू शकते. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत सोमैया सर्वप्रथम ईशान्य मुंबईतून खासदार झाले. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये त्यांचा सलग दोनदा पराभव झाला. परंतु 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले.

सोमैयांचा पत्ता कट - 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकाच्या निवडणुकीमध्ये किरीट सोमैया यांनी शिवसेनेबरोबरच उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांचा फायदा भाजपाला निवडणुकीत झाला खरा, परंतु किरीट सोमैया यांनी मातोश्री आणि शिवसैनिकांचा रोष ओढून घेतला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपामध्ये पुन्हा दिलजमाई झाली. त्यात किरीट सोमैया यांचा राजकीय बळी गेला. किरीट सोमैया यांच्या उमेदवारीसाठी शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला. या विरोधात भाजपाला सुद्धा किरीट सोमैया यांचं तिकीट कापावं लागलं. याचाच उल्लेख सोमयांनी भाजपाला लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्यांनी 18 फेब्रुवारी 2019 रोजी वरळी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या प्रसंगाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे त्यांना ती परिषद सोडण्याचे निर्देश देण्यात आले असं सांगितलं आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार प्रसाद लाड यांनाही निवडणूक समितीपासून दूर ठेवल्यानं ते सुद्धा नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

वाल्याचा वाल्मिकी झाला, किरीट सोमैया एकटे पडले - किरीट सोमैया यांनी राज्यातील तत्कालीन विरोधी पक्षांच्या नेत्यांचे भ्रष्टाचाराचे अनेक घोटाळे उघड करून त्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. यामध्ये अजित पवार यांचा सिंचन घोटाळा, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा, छगन भुजबळ यांचा महाराष्ट्र सदन घोटाळा, नारायण राणे यांची बेहिशेबी मालमत्ता, प्रताप सरनाईक यांचा विहंग हाउसिंग स्कीम घोटाळा, अनिल परब यांचा वांद्रे पूर्वेकडील गांधीनगर येथील अनधिकृत बांधकाम घोटाळा, माजी खासदार भावना गवळी यांच्या संस्थेमधील १०० कोटींचा घोटाळा, रवींद्र वायकर यांचा हॉटेल घोटाळा, मिलिंद नार्वेकर यांचा कोकणातील अनधिकृत बंगला घोटाळा, हसन मुश्रीफ यांचा 127 कोटींचा भ्रष्टाचार, संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळा, अशाप्रकारे अनेक घोटाळे किरीट सोमैया यांनी बाहेर काढले आणि त्यांच्यामागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावला. तर यापैकी अनेक नेत्यांना जेलवारी सुद्धा करावी लागली. परंतु एकनाथ शिंदे गट शिवसेनेतून आणि अजित पवार गट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातून बाहेर पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते सर्व सत्तेत एकत्र आले व वाल्याचा वाल्मिकी झाला. यामध्येच किरीट सोमैया यांची गोची झाली. भाजपा पक्षात किंवा महायुतीत आल्याने भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भ्रष्टाचारमुक्त होतात अशी टीका विरोधकांकडून होऊ लागली. याबाबत अनेकदा उत्तर देताना किरीट सोमैया यांना तोंड लपवावे लागले. अशा परिस्थितीमध्ये भाजपामधील किरीट सोमैया यांची नाराजी पक्षाला हानिकारक ठरू शकते. त्यातच विरोधी पक्ष याचा पुरेपूर फायदा घेण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा..

  1. किरीट सोमय्यांचा लेटर बॉम्ब : 'पुन्हा अपमानास्पद वागणूक देऊ नका', निवडणूक आयोग संपर्कप्रमुख पदावर काम करण्यास नकार
  2. उद्धव ठाकरेंचे भ्रष्टाचार बाहेर काढण्याची इच्छा नव्हती, मात्र पक्षादेश म्हणून घोटाळे बाहेर काढले; किरीट सोमैयांचा मोठा गौप्यस्फोट
  3. किरीट सोमैयांविरोधात तक्रार द्यायला 5 महिला समोर आल्या, पण घाणेरडं राजकारण आम्ही करणार नाही - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details