मुंबई : भारतातील सर्वश्रेष्ठ कलाकारांपैकी एक असलेले वासुदेव संतु गायतोंडे यांच्या जीवन आणि कार्यावर (Gaitonde journey of life) आधारित एका व्यापक ग्रंथाच्या प्रकाशनाची घोषणा 'चिन्ह पब्लिकेशन्स' यांनी केली आहे. २००१ मध्ये गायतोंडे यांचं निधन झालं होतं. गायतोंडे यांच्या जीवनाचे आणि कार्याचे स्मरण करण्यासाठी 'चिन्ह' मासिकाचे आणि 'चिन्ह आर्ट न्यूज' या वेबसाइटचे संस्थापक-संपादक सतीश नाईक यांनी मासिकाचा एक विशेष अंक प्रकाशित केला होता. या अंकात गायतोंडे यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि जवळचे सहकारी यांनी लिहिलेले अनेक लेख होते. चिन्ह मासिकाचा हा अंक या महान कलाकारावरील नाईक यांचे स्वप्न असलेल्या व्यापक ग्रंथाच्या निर्मितीसाठी चालना देणारा ठरला.
नाईक यांनी घेतली मेहनत: या एकांतप्रिय कलाकाराच्या कलेशी, त्याच्या कुटुंबाशी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गायतोंडे यांच्या नंतरच्या सर्व कामांवर ज्याचा प्रभाव पडला, अशा झेन बुद्धीझम आणि त्यांच्या अध्यात्मिक प्रवासावर प्रकाश टाकणाऱ्या साहित्याचा शोध घेण्यात नाईक यांनी अनेक महिने आणि वर्षे घालवली.
सतीश नाईक (चिन्ह पब्लिकेशन्स) तरुण कलाकारांसाठी प्रेरणास्रोत : गायतोंडे यांचे कला क्षेत्रातील असाधारण योगदान आणि महत्त्व लक्षात घेता, नाईक यांनी आणखी एक पाऊल पुढे जाऊन त्या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा अनुवाद शांता गोखले यांनी केला. या इंग्रजी पुस्तकात १ लाखापेक्षा जास्त शब्द संख्येचे लेख व मुलाखती, तसेच गायतोंडे यांनी काढलेली १२० चित्रे, या पुस्तकासाठी खास निर्माण केलेली गायतोंडे यांची २० पोर्ट्रेट्स आणि त्यांची ७४ दुर्मिळ छायाचित्रे आहेत. २७ फेब्रुवारीला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्या हिरवळीवर पद्मभूषण डॉ. नंदकिशोर लाड, पद्मश्री डॉ. सरयू दोशी, डॉ. फिरोजा गोदरेज, प्रयाग शुक्ला, पद्मश्री कुमार केतकर आणि अमोल पालेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन केलं जाईल. चिन्ह पब्लिकेशन्सने हे पुस्तक २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनापर्यंत मर्यादित कालावधीसाठी प्रकाशनपूर्व सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले आहे. हे पुस्तक कलाप्रेमी व कलासंग्राहकांसाठी एक महत्त्वाचा संदर्भ आणि संग्रहणीय पुस्तक, तर तरुण कलाकारांसाठी प्रेरणास्रोत ठरणार आहे.
सतीश नाईक (चिन्ह पब्लिकेशन्स) हेही वाचा -
- "आवडेल ते पुस्तक योग्य वाटेल ती किंमत"; 89 वर्षे जुन्या महाराष्ट्र ग्रंथ भांडार संस्थेचा उपक्रम
- "नाचायला नव्हे तर पुस्तक वाचायला आली", लावणी स्टार गौतमी पाटीलची पुणे पुस्तक महोत्सवाला भेट
- वाचाल तर वाचाल! सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पिढीला वाचनाकडे वळविण्यासाठी अनोखा उपक्रम