मुंबई Ganesh Visarjan 2024 :मंगळवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी दहा दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. मुंबईत सर्वत्रच विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. या विसर्जन मिरवणुकांमध्ये घरगुती गणपती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणपती बाप्पांचा समावेश होता. मुंबईकरांना आपल्या घराजवळच लाडक्या बाप्पाचं विसर्जन करता यावं, यासाठी महापालिकेनं कृत्रिम तलावांची निर्मिती देखील केली. मुंबईत एकूण किती गणपतीचं विसर्जन झालं, या विसर्जनाची आकडेवारी आता समोर आली. मुंबईत बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 37 हजार 534 गणपतींचं विसर्जन झाल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. विसर्जनानंतर महापालिकेचे कर्मचारी लगेचच सफाईच्या कामाला सुरुवात करतात. यातून तब्बल साडेपाचशे मेट्रिक टन निर्माल्य जमा झाल्याची माहिती देखील महापालिकेनं दिली आहे.
मुंबईतील चौपाट्यांवर इतकं मेट्रीक टन निर्माल्य :याबाबत महापालिकेनं दिलेली माहिती अशी की, "गणपती मूर्तींचं विसर्जन झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध चौपाट्यांवर, समुद्र किनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्याद्वारे 363 मेट्रिक टन घन कचरा संकलन करण्यात आलं. चौपाट्यांवर दररोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी नित्यनेमानं येणाऱ्या मुंबईकरांसाठी हा सर्व परिसर संपूर्ण स्वच्छ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवात नैसर्गिक आणि कृत्रिम तलाव अशी सर्व मूर्ती विसर्जन स्थळं मिळून सुमारे 550 मेट्रिक टन निर्माल्य संकलन करण्यात आलं. या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची कार्यवाही देखील तत्काळ सुरू करण्यात आली," असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
चौपाट्यांवर विशेष स्वच्छता मोहीम :गणपती विसर्जनानंतर गिरगाव, दादर, चिंबई, जुहू, वर्सोवा, मढ, गोराई या चौपाट्यांसह इतर सर्वत्र देखील विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी यंदा मूर्ती विसर्जनासाठी 69 नैसर्गिक स्थळांसह एकूण 204 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली. सोबतच निर्माल्य संकलनासाठी 500 हून अधिक निर्माल्य कलश आणि हे निर्माल्य वाहून नेण्यासाठी 350 निर्माल्य वाहक वाहनं महापालिकेनं नेमलेली होती. या स्वच्छता मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या 7 हजार कर्मचाऱ्यांसोबतच स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या मदतीनं एकूण 363 मेट्रिक टन घनकचरा संकलित करण्यात आल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.
निर्माल्यापासून करणार सेंद्रिय खत :चौपाट्यांवरील स्वच्छता मोहिमेत खाद्यपदार्थांचे रॅपर्स, पाण्याच्या बाटल्या, पिशव्या यांसह पादत्राणं आणि इतर वस्तू देखील मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आल्या आहेत. या संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खत करण्याची कार्यवाही घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे सुरू असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. यंदा सुमारे साडेपाचशे मेट्रिक टन निर्माल्य संकलन झालं आहे. महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांमध्ये असणाऱ्या विविध 37 सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पांमध्ये हे निर्माल्य नेण्यात आल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. संकलित केलेलं हे निर्माल्य आता खत निर्मितीसाठी पाठवण्यात आलं आहे. निर्माल्यापासून खत निर्मितीला सुरुवात देखील झाली. साधारणपणे एका महिन्यात या निर्माल्याचं रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होईल. हे खत महानगरपालिका उद्यानांमध्ये वापरासाठी देण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनानं दिली आहे.
हेही वाचा :
- गणेश विसर्जन मिरवणुकीत सामाजिक सलोखा, बाप्पांच्या चरणी मुस्लिम महिलांच्या आरोग्य पथकाची 'सेवा' - Kolhapur Ganpati Visarjan 2024
- गणपती बाप्पावर 'महाकाल'कडून पुष्पवृष्टी, विसर्जन मिरवणुकीचं ठरलं आकर्षण - Ganesh visarjan 2024
- 'मुंबईचा राजा' गणपती बाप्पाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन; आतापर्यंत 19,996 गणपती बाप्पाला भाविकांचा निरोप - Ganesh Visarjan 2024