नाशिक :येथीलआगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचं जागतिक स्तरावर ब्रॅण्डिंग करण्याबरोबरच रिलीजस हब करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. मात्र, दुसरीकडं आधीच्या भूसंपादनाचे पैसे दिले नाहीत मग आम्ही कुंभमेळ्यासाठी जमीन का देऊ? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय.
2027 मध्ये नाशिक सिंहस्थ कुंभमेळा: कुंभनगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिहस्थ कुंभमेळ्यामुळं नाशिकचा चेहरे मोहरा बदलला जातो. केंद्र आणि राज्य सरकारकडून येणाऱ्या करोडो रुपयांच्या निधीच्या माध्यमातून नाशिकमध्ये अनेक विकासाची कामं होतात. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला ऑगस्ट ते नोव्हेंबर 2027 च्या दरम्यान सिंहस्थ कुंभमेळा होतोय. अशात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकच्या सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली. यावेळी नाशिक विभागीय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी 7 हजार 767 कोटी रुपयांच्या सिंहस्थ कुंभ आराखड्याचं सादरीकरण केलं. नाशिक येथे साधुग्रामसाठी अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्यानं, तेथील जमीन संपादित करण्यात यावी. येथे नगररचना परियोजन करून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापित करून ते नगरपालिकेकडं हस्तांतरीत करावे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अतिक्रमणं आहेत अशा ठिकाणची अतिक्रमणं तत्काळ हटवा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.
100 एकर जमीन महानगरपालिकेकडं : सिंहस्थ कुंभमेळ्यात तपोवन भागात साधूग्रामसाठी 375 एकर जमीन महानगरपालिकेला भूसंपादन करण्याची गरज आहे. त्यापैकी या आधी 100 एकर जमीन महानगरपालिकेनं संपादित केलीय. अजून 275 एकर जमीन महानगरपालिकेला हवी आहे. याआधीच्या आराखड्यात महानगरपालिकेनं जागेचं भूसंपादन करण्यासाठी 3 हजार 500 कोटींची मागणी केली होती. मात्र 12 वर्षातून एकदाच सिंहस्थ कुंभमेळा होत असून केवळ 11 महिन्यासाठी जागेची आवश्यकता असल्यानं ती जागा भाडेतत्त्वावर घ्यावी अशा सूचना राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.