मुंबई-महाराष्ट्र हे देशातील पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. सुसंस्कृत राजकारण करणारे राज्य म्हणून त्याची आतापर्यंत ओळख आहे, मात्र या ओळखीला तडा जाऊ देणारी परिस्थिती हळूहळू निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येतंय. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला, मतदान झाले आणि निकालदेखील लागलाय. मात्र, प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांमधील चिखलफेक अन् प्रचाराचा खालावलेला दर्जा, खालच्या पातळीवर जाऊन केलेले आरोप-प्रत्यारोप यांना मात्र अद्यापही ब्रेक लागलेला नाही. उलट राज्यात निकालानंतर या आरोप-प्रत्यारोपांना खालच्या पातळीवरील वक्तव्यांना अधिकच धार आल्याचे चित्र दिसून येतंय.
मविआच्या अपयशाचे खापर ईव्हीएमवर : विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले, तर शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागलाय. त्यावरून अपयशाचे खापर ईव्हीएमवर फोडण्यात येतंय. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मारकडवाडीमधील मतपत्रिकेवरील मतदानाच्या आग्रहामुळे हा वाद आणखी चिघळलाय. यातूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकरांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेली वक्तव्य चर्चेत आलीत.
महाराष्ट्र हे देशातील पुरोगामी राज्य :50 ते 60 वर्षांत शरद पवारांची पहिल्यांदाच राजकीय हत्या झालीय, अशी टीका भाजपाचे आमदार सदाभाऊ खोतांनी केलीय. देवाभाऊ वस्ताद आहेत, तर बारामतीचा पैलवान हा पैलवान नव्हे दुधी भोपळा आहे. शरद पवारांना एवढं हाणलंय तरी म्हणतंय मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, चेहरा काय तुमच्या चेहऱ्यासारखा बदलायचाय, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी टीकास्त्र सोडले होते. तर 100 शकुनी मेले तेव्हा पवार जन्माला आले, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. महाराष्ट्र हे देशातील पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. सुसंस्कृत राजकारण करणारे राज्य म्हणून त्याची आतापर्यंत ओळख आहे, मात्र या ओळखीला तडा जाऊ देणारी परिस्थिती हळूहळू निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येतंय. एकीकडे भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा सन्मान केला जाणार आहे, बदला घेणारे राजकारण केले जाणार नाही, अशी संयत भूमिका विधानसभेतदेखील घेतलीय. असे असताना त्यांच्याच पक्षाचे वाचाळवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पडळकर आणि खोत या आमदारांनी पवारांवर केलेल्या अश्लाघ्य टीकेवर आश्चर्य व्यक्त केले जातंय.