मुंबई Chhagan Bhujbal Meet Sharad pawar :राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. छगन भुजबळ यांनी कालच बारामती येथील जाहीर सभेतून शरद पवारांवर आरक्षण प्रश्नावरून गंभीर आरोप करत टीका केली होती. मात्र, आज दुसऱ्याच दिवशी ते पवार यांच्या भेटीसाठी गेल्यानं राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीला न जाण्यासाठी बारामतीमधून फोन आला होता, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भुजबळांकडे तसा फोन केल्याचा पुरावा आहे का? असे म्हटले होते. तर जितेंद्र आव्हाड यांनी पवारांचे नाव घेतल्याशिवाय कुणी दखल घेत नाही, असा भुजबळांना टोला लगावला होता. असे आरोप-प्रत्यारोप सुरू असताना भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी का गेले? नवीन राजकीय समीकरणे अस्तित्वात येणार का? या शक्यतेनं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
- खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत माहिती नसल्याचे सांगितले. " मी सध्या पुण्यात आहे. त्यांच्या भेटीबाबत माहिती घेऊन सांगू, मुंबईतील घटनांबाबत आता सांगू शकत नाही. माझ्यासाठी येथील प्रश्न महत्त्वाचे आहेत. कात्रजच्या चौकाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. कात्रज घाटाचे नाहीत," अशी मिश्किल टिप्पणीदेखील केली.