अमरावतीNavneet Rana News :बेलोरा विमानतळावरून येत्या ऑगस्ट महिन्यात विमानसेवा सुरू होणार असल्याचा दावा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. विमानतळाच्या धावपट्टीच्या रुंदीकरणाचं काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. अमरावतीची जनता तेरा वर्षांपासून विमान उड्डाणांच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळं खासदार नवनीत राणा यांनी आज बेलोरा विमानतळाची पाहणी केली. जून-जुलै महिन्यात विमानतळाच्या काम पूर्ण होणार आहे. ऑगस्टमध्ये विमान हवेत झेपावणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
राजकारण्यानी केलेले दावे ठरले फोल :अमरावती विमानतळाच्या विस्तारित कामाचं भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 19 जुलै 2019 रोजी करण्यात आलं होतं. भूमिपूजन समारंभात अमरावती विमानतळ ऑगस्ट 2020 मध्ये सुरू होईल, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात विमानतळाच्या कामाला दिरंगाई झाल्याचं दिसून येत आहे. याबाबत 27 जानेवारी 2021 रोजी खासदार नवनीत राणा यांनी विमानतळाची पाहणी केली होती. तेव्हा त्यांनी 2022 मध्ये विमानतळ सुरू होणार असल्याचा दावा केला होता.
सर्व दावे आजवर ठरले फोल-खासदार अनिल बोंडे यांनी 28 ऑक्टोबर 2022 रोजी विमानतळाची पाहणी करत अमरावतीतून थेट विमान उड्डाण होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र सर्व राजकारण्यांनी केलेले दावे फोल ठरले आहेत. आज खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा अमरावती विमानतळ उड्डाण होणार असल्याचा दावा केला आहे. तसंच त्यांनी विमानतळ पाहणीत टर्मिनस, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचं काम जून-जुलैपर्यंत पूर्ण होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतरच अमरावतीहून विमानसेवा सुरू होईल, असं खासदार राणा यांनी स्पष्ट केलं.
उच्च न्यायालयानं बजावली होती नोटीस :सलग तेरा वर्षांपासून अमरावती विमानतळाचा कुठलाही विकास होत नसल्यामुळं जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी 2022 मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या विभागीय अधिकाऱ्यासह संचालकांना नोटीसदेखील बजावली होती. उच्च न्यायालयानं नोटीस बजावल्यानंतर विमानतळाच्या कामाला गती आली होती.