गॉल SL Beat NZ in 2nd Test : श्रीलंका आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना गॉल इथं खेळला गेला. या सामन्यात यजमान श्रीलंकेनं एक डाव आणि 154 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात फॉलोऑन मिळालेल्या न्यूझीलंड संघानं खेळाच्या चौथ्या दिवशी (29 सप्टेंबर) दुसऱ्या डावात 360 धावांपर्यंत मजल मारली. या विजयासह श्रीलंकेच्या संघानं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिला आहे.
कसोटीत पदार्पण करणाऱ्या श्रीलंकेनं खेळाडूंची छाप : गॉल इथं खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेनं किवी संघाचा 63 धावांनी पराभव केला होता. श्रीलंकेनं 15 वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली. यापूर्वी 2009 मध्ये मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव केला होता. तसंच, डावाच्या जोरावर श्रीलंकेचा न्यूझीलंडविरुद्धचा हा सर्वात मोठा विजय ठरला. सामन्याच्या दुसऱ्या डावात उजव्या हाताचा ऑफब्रेक गोलंदाज निशान पेरिसनं श्रीलंकेकडून सहा विकेट घेतल्या. पेरिसचा हा पदार्पण कसोटी सामना होता. त्यानं पहिल्या डावातही तीन विकेट्स घेतल्या होत्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सनं दुसऱ्या डावात सर्वाधिक 78 धावा केल्या. मिचेल सँटनर (67) आणि डेव्हॉन कॉनवे (61) यांनीही अर्धशतकी खेळी खेळली.
पहिल्या श्रीलंकेचा धावडोंगर : या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून पहिला डाव 5 गड्यांच्या मोबदल्यात 602 धावांवर घोषित केला. श्रीलंकेसाठी कामिंडू मेंडिसनं नाबाद 182 धावा (250 चेंडू, 16 चौकार आणि 4 षटकार) केल्या. तर दिनेश चंडिमलनंही 116 धावांची खेळी केली. चंडिमलनं 208 चेंडूंचा सामना करत 15 चौकार मारले. कुसल मेंडिसनं 149 चेंडूंचा सामना करत सहा चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 116 धावा केल्या. किवी संघाकडून ग्लेन फिलिप्सनं सर्वाधिक दोन बळी घेतले. यानंतर प्रभात जयसूर्या आणि निशान पेरिस या फिरकीपटूंनी मिळून न्यूझीलंडचं कंबरडं मोडलं. किवी संघ पहिल्या डावात अवघ्या 88 धावांत सर्वबाद झाला होता. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे श्रीलंकेला 514 धावांची भक्कम आघाडी मिळाली. मिचेल सँटनरनं सर्वाधिक 29 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्यानं 6 आणि पेरीसनं तीन विकेट घेतल्या.