रावळपिंडी PAK vs BAN Match Impact : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा नववा सामना आज 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि बांगलादेश क्रिकेट संघात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता रावळपिंडीमधील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर सुरु होणार होता. परंतु रावळपिंडीत सुरु असलेल्या मुसळधार पावसानं हा सामना रद्द झाला आहे. असं असलं तरी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान-बांगलादेशची खराब कामगिरी : चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या स्पर्धेत चुकांना फार कमी जागा असते. एकही सामना गमावल्यास स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येतं. पण यजमान पाकिस्ताननं पहिल्या दोन सामन्यांमध्ये खराब खेळ केला. परिणामी न्यूझीलंड आणि भारताकडून दारुण पराभव पत्करल्यानंतर, घरच्या मैदानावर चॅम्पियन्स होण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं. दुसरीकडे बांगलादेशचीही तीच अवस्था होती, ज्यामुळं या दोन्ही संघांमधील सामना केवळ औपचारिकता राहिला होता.
पाकिस्तान सलग तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या गट फेरीतून बाहेर : पाकिस्तान तब्बल 29 वर्षांनंतर एखाद्या जागतिक स्पर्धेचं आयोजन करत आहे. पण संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर आता देशाच्या क्रिकेट रचनेत आमूलाग्र बदल करण्याची मागणी होत आहे. जागतिक मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पाकिस्तानला बाहेर पडण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. यापूर्वी, 2023 मध्ये झालेल्या वनडे विश्वचषक आणि 2024 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तान संघ पहिल्या फेरीच्या पुढं प्रगती करु शकला नाही. तिच अवस्था या स्पर्धेतही कायम राहिली.
सामना पावसात गेल्यास गुणतालिकेवर काय परिणाम होईल :पाकिस्तान आणि बांगलादेशचे संघ भारत आणि न्यूझीलंडसह ग्रुप अ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. परंतु पाकिस्तान आणि बांगलादेश संघांना पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करावं लागल्यानं त्या संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असून भारत आणि कीवी संघानं याआधीच सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. परिणामी या सामन्याच्या निकालाचा कोणताही परिणाम गुणतालिकेवर होणार नाही.
हेही वाचा :
- मैदानात घुसून पकडली खेळाडूची कॉलर; पाकिस्तानात खेळाडूंची सुरक्षा रामभरोसे
- सेमी-फायनलपासून अफगाणिस्तान एक पाऊल दूर... 'साहेबां'सह कांगारुही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर?