कोलंबो Australia Team in Sri Lnaka :2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला 2 सामन्यांची कसोटी आणि वनडे मालिका खेळायची आहे. यातील कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या म्हणजेच WTC च्या अंतिम सामन्यापूर्वीची शेवटची कसोटी मालिका असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपलं स्थान आधीच निश्चित केलेला ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेच्या भूमीवर ही टेस्ट मालिका खेळणार आहे. तसंच या कसोटी मालिकेनंतर, दोन्ही संघांमध्ये एकमेव वनडे सामना खेळला जाईल, जो चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025 च्या तयारीच्या दृष्टीनं दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल. ही कसोटी मालिका 29 जानेवारीपासून सुरु होईल. कसोटी मालिकेतील दोन्ही सामने गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील. दुसरा कसोटी सामना 6 फेब्रुवारी रोजी सुरु होईल आणि त्यानंतर दोन्ही संघ 12 फेब्रुवारी रोजी कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर दोन वनडे सामने खेळणार आहेत.
कांगारु संघ लंकेत दाखल : श्रीलंकेच्या या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच जाहीर करण्यात आला, ज्यात पॅट कमिन्सचं नाव समाविष्ट नव्हतं. अशा परिस्थितीत, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी स्टीव्ह स्मिथला कांगारु संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. आता स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघानं या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेच्या भूमीवर पाऊल ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियन संघ 25 जानेवारी रोजी श्रीलंकेत पोहोचला, ज्याचे फोटो श्रीलंका क्रिकेट (SLC) नं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्रीलंका क्रिकेटनं फोटो शेअर केले आणि लिहिलं, ऑस्ट्रेलियाचं स्वागत आहे! श्रीलंकेच्या भूमीवर मालिका सुरु झाली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंका दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक :
- पहिला कसोटी सामना : 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी, गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियम
- दुसरा कसोटी सामना : 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी, गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियम
- पहिला वनडे सामना : 12 फेब्रुवारी, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
- दुसरा वनडे सामना : 14 फेब्रुवारी, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो