'अडसूळांना अयोध्येत रामाचं दर्शन घडवू', असं वक्तव्य रवी राणांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना केलं अमरावती Ravi Rana On Anandrao Adsul : देशात लवकरच लोकसभा निवडणुका होणार असून यासाठी सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. मात्र, असं असतानाच महायुतीमध्ये जागावाटपावरून अद्यापही मनोमीलन झाल्याचं दिसत नाहीये. महायुतीतील सर्वच नेते जाहिरपणे आपल्या उमेदवारीचा दावा करत आहेत. तर अमरावती मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ आणि खासदार नवनीत राणा इच्छूक आहेत. याविषयी बोलत असताना नवनीत राणाच अमरावतीतून लढतील, असा दावा अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलाय. तसंच आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ यांना त्यांचा प्रचार करण्यासाठी यावं लागेल, असं देखील ते म्हणालेत. रवी राणांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
अडसूळांना अयोध्येत रामाचं दर्शन घडवू : यासंदर्भात आज (3 मार्च) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना रवी राणा म्हणाले की, "काही लोक कितीही वय झालं तरी राजकारण सोडत नाहीत. आनंदराव अडसूळांचं वय 80 वर्षे असलं तरी त्यांचं राजकारण अजूनही सुरू आहे. आज अमरावती रेल्वे स्थानकावरून अयोध्येस जाण्यासाठी विशेष गाडी सुटली. यापुढं अयोध्येला जाणाऱ्या दोन गाड्यांमधून आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ यांना प्रभू श्री रामांच्या दर्शनासाठी पाठवू", असं ते म्हणाले.
नवनीत राणांचा प्रचार करणार : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंदराव अडसूळ आणि अभिषेक अडसूळ हे नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी येतील. अडसूळ हे वरिष्ठ नेते असल्यानं ते नक्कीच राणा यांच्यासाठी मतं मागतील", असा दावा रवी राणा यांनी केला आहे. तर रवी राणा यांच्या या दाव्यामुळं आता नवनीत राणा यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अयोध्येसाठी विशेष रेल्वे : अमरावती जिल्ह्यातील राम भक्तांना अयोध्येत प्रभू श्री रामांच्या दर्शनासाठी जाता यावं यासाठी रेल्वे मंत्रालयानं भाविकांची खास व्यवस्था केली आहे. आज अमरावतीवरून अयोध्येसाठी विशेष रेल्वे निघाली असून अजून दोन रेल्वे येत्या काही दिवसांत अमरावतीवरून अयोध्येला जातील. या विशेष रेल्वेमुळं अमरावती जिल्ह्यातील राम भक्तांना अयोध्येत जाण्याची संधी उपलब्ध झाल्याचंही रवी राणा म्हणाले.
हेही वाचा -
- भाजपात प्रवेश करणार का ? खासदार नवनीत राणांनी स्पष्टचं सांगितलं; 'उद्या जेपी नड्डांच्या उपस्थितीत करणार शक्ती प्रदर्शन'
- 'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवणीत राणा लोकसभा निवडणुकीत दिसणार नाहीत'
- नवनीत राणांच्या अडचणी वाढल्या : जात प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाचं प्रतिकूल निरीक्षण