पुणे Sunetra Pawar : सुनेत्रा पवार बाहेरुन आलेल्या आहेत, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांचे सासरे शरद पवारांनी केल्यावर आज महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. त्या म्हणाल्या, " बारामती लोकसभेची निवडणूक ही विचारांची निवडणूक आहे. ती वैयक्तिक पातळीवरची कधीच नव्हती आणि होणार नाही, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांनी पुण्यातील मार्केट यार्ड कमिटीमध्ये आज येथील व्यापारी आणि शेतकऱ्याची संवाद साधला. त्यानंतर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
वैचारिक मुद्द्यांची निवडणूक: यावेळी बोलताना महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार म्हणाल्या, "मतदारसंघात प्रचंड उत्साह आहे. खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. इतकी वर्षे मी अनेक उमेदवारांसाठी मतं मागितली. पण आता जबाबदारीची वेगळी भावना माझ्यात आलीय. जबाबदारी पूर्ण होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सगळीकडे पाण्याची टंचाई आहे. यंदा पाऊसदेखील कमी पडला आहे. शेतकरी राजा अडचणीत आहे. पाणीपुरवठ्यासाठी अनेक योजना राबवण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात प्रयत्न करणार आहे. ही निवडणूक वैचारिक मुद्द्यांची आहे. नात्याची निवडणूक नाही. पवारांनी केलेली टीका आहे. त्यांचं मत असेल आणि मला नाही वाटत की ते वैयक्तिक माझ्याविषयी काही माझ्यासोबत बोलतील किंवा माझ्यावर टीका करतील."