प्रतिक्रिया देताना भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये मुंबई Lok Sabha Election 2024 :राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट संघर्ष होणार आहे. जागा वाटपात कोण बाजी मारतं याकडं राज्यातील जनतेचं लक्ष असताना महाविकास आघाडीनं जागा वाटपाचं (Mahayuti Seat Sharing Issue) सूत्र ठरवून घटक पक्षांना जागा निश्चित केल्या. काही जागांवर अद्यापही उमेदवारांबाबत नाराजी आहे. मात्र, या तुलनेत महायुतीच्या जागा वाटपांचं सूत्रही अजून निश्चित झालं नाही. अजित पवार यांच्या पक्षानं अन्य घटक पक्षांनाही आपल्या कोट्यातून उमेदवारी दिलीय. मात्र, शिवसेना अध्यक्ष आणि भाजपा यांच्यातील रस्सीखेच काही संपताना दिसत नाही. अजूनही राज्यातील आठ जागांवर तिढा कायम आहे.
कोणत्या जागांवर आहे रस्सीखेच :दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यात अजूनही चढाओढ सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाकडून यशवंत जाधव आणि बाळा नांदगावकर यांच्या नावांबाबत चाचपणी करण्यात आली, तर भाजपाच्या वतीनं मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांची या जागेसाठी चढाओढ सुरू आहे. हा मतदारसंघ गुजराती आणि मुस्लिम मतदारांचा अधिक असल्यानं या ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराला संधी असल्याचं भाजपाकडून सांगण्यात येतय.
उत्तर पश्चिम मुंबई : उत्तर-पश्चिम मुंबई मतदार संघातून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना उबाठा गटाने उमेदवारी दिलीय. या जागेवरून शिवसेना भाजपा महायुतीकडं निवडून येणारा सक्षम उमेदवार देता येत नसल्यानं हा मतदार संघ कोणाला सोडायचा यावर चर्चा अजूनही सुरू आहे.
उत्तर-मध्य मुंबई: उत्तर-मध्य मुंबई या मतदारसंघातून विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी देण्याबाबत भाजपा उत्सुक नाही. त्या ऐवजी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना उमेदवारी स्वीकारण्याबाबत विनंती केली जात आहे. मात्र, शेलार यांनी अद्याप होकार दिलेला नाही. त्यामुळं या जागेवरून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत अजूनही निश्चिती झाली नसल्यानं या मतदारसंघाची घोषणाही अजून अधांतरी आहे.
नाशिक: नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची चर्चा आहे आणि समर्थकांनी जोरदार मागणी केलीय. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. भुजबळांनीही या जागेसाठी तयारी केली आहे. मात्र, जर भुजबळांना उमेदवारी दिली तर गोडसे समर्थक नाराज होण्याची शक्यता असल्यानं या जागेबाबतचा निर्णयही अद्याप महायुतीला घेता आलेला नाही.
ठाणे: शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभेची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलीय. त्यामुळं आता कल्याण किंवा ठाणे हा एक मतदार संघ भाजपाला हवाच होता. त्यामुळं आता भाजपाला ठाणे मतदार संघ हवा आहे तर शिंदे गट हा मतदारसंघ सोडायला तयार नाही. शिवसेनेकडून रवींद्र फाटक आणि नरेश मस्के या मतदारसंघातून इच्छुक आहेत, तर भाजपाकडून संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, त्याच्यावर शिक्का मोर्तब झालेलं नाही.
पालघर :पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, पालघर हा मतदारसंघ शिवसेना पक्षाकडं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं गावित यांनी कोणाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची हा पेच निर्माण झाला आहे. पालघरची जागा ही शिवसेनेची आहे. इथला पारंपरिक मतदार शिवसेनेचा असल्यानं गावित यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा शिवसेनेचा आग्रह आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. छत्रपती संभाजीनगरात पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीवर दावा केलाय. मात्र, त्यांचा विधानसभा मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळं त्यांना उमेदवारी देणं किती सयुक्तिक आहे, यावर चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडं मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी भरण्याची तयारी केली आहे. त्यामुळं त्यांना संधी देता येईल का? याबाबतही महायुतीकडून चाचणी सुरू असल्यानं या जागेबाबत संभ्रम कायम आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग :रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेचा वाद गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी शिवसेना शिंदे गटाकडून या जागेवर आक्रमकरीत्या दावा सांगितला आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपाकडून हा मतदार संघ आपल्यालाच मिळावा यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. या दोन तुल्यबळ नेत्यांच्या संघर्षात या जागेची घोषणा महायुतीला करता येत नाही. किरण सामंत यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्यानं चर्चा करत आहेत, मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही.
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून आपल्याला तिकीट जाहीर होईल असं माजी खासदार छत्रपती उदयनराजे सांगत आहेत. तर हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्यानं अजित पवार या मतदारसंघातून उमेदवार जाहीर करतील अशी चर्चा आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटही सातारा मतदारसंघासाठी आग्रही असल्यानं या मतदारसंघाची घोषणाही अद्याप करण्यात आलेली नाही.
महायुतीमध्ये काही जागांबाबत चर्चा सुरू आहे, अद्याप जाहीर झाल्या नाहीत हे खरे आहे. मात्र, आमच्यात कोणतेही मनभेद नाहीत. निवडणुका टप्पा निहाय असल्यानं आम्ही त्यावर योग्य चर्चा करूनच निर्णय घेणार आहोत. परंतु महाविकास आघाडीमध्ये उमेदवार जाहीर होऊनही मतभेद दिसत आहेत. तसं आमच्या दिसणार नाहीत आणि एक-दोन दिवसात याबाबतचा निर्णय जाहीर होईल. - केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते (भाजपा)
चर्चा सुरू, मनभेद नाही : जागा वाटपाचं भिजत घोंगडं असल्याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, आम्ही अजूनही परस्परांशी चर्चा करत आहोत. आमचे वरिष्ठ नेते एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेत आहेत. महाविकास आघाडीनं जरी जागावाटप पूर्ण केलं असलं तरी त्यांच्यामधील मतभेद समोर येत आहेत. काही ठिकाणी काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीत हे स्पष्ट दिसतं आहे, तशी आमची परिस्थिती नाही. काही जागांवरून निश्चितच आमच्यात मतभेद आहेत त्यावर तोडगा काढण्याचं काम सुरू आहे. मात्र, आमच्यात कोणत्याही पद्धतीचं मनभेद नाहीत. कार्यकर्ते आणि नेते जरी आत्ता काही प्रमाणात संभ्रमात असले तरी लवकरच याबाबतचं चित्र स्पष्ट होईल. जागावाटप आणि उमेदवार जरी काही जागांवरील आम्ही घोषित केले नसले तरी, आम्ही प्रचाराला सुरुवात केलीय आणि आम्हाला योग्य प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा -
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून किरण सामंत निवडणूक लढवणार? काय म्हणाले दीपक केसरकर? - Lok Sabha Election 2024
- 'शरद पवार निखारा, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है'; खासदार अमोल कोल्हे - Amol Kolhe
- "मला मूर्ख समजू नका, मी जेवढे सांगायचे तेवढं सांगितलेलं आहे"; उपमुख्यमंत्री अजित पवार असं का म्हणाले? - AJIT PAWAR