नागपूर Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची महाराष्ट्रातील पहिली सभा आज विदर्भातील चंद्रपुर येथे होत आहे. नरेंद्र मोदीच्या सभेसाठी प्रचंड उत्साह दिसत असल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं. ते आज नागपूर येथील निवासस्थानी बोलत होते. मोदींच्या सभेनंतर वातावरण बदलत आहे. आधीच महाराष्ट्रात एनडीएला अनुकूलता दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर अनुकूलता आणखी वाढेल. १० एप्रिल रामटेक लोकसभा मतदारसंघातही नरेंद्र मोदींची सभा होणार असल्याचं फडणवीस म्हणाले.
गुडीपडव्याला मनसे एनडीएमध्ये सहभागी होईल का?: एनडीएमध्ये मनसेला सोबत घेण्याच्या संदर्भातील चर्चा गेल्या काही काळात झाल्या होत्या. मनसेनं जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा स्वीकारला आहे तेव्हापासून आमची त्यांच्यासोबतची जवळीक वाढलीय. राज ठाकरे यांनी 2014 पासूनच मोदींना पाठिंबा दर्शवला होता. नरेंद्र मोदीं यांना पंतप्रधान केलं पाहिजे अशी जाहीर भूमिकाही त्यांनी घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचा विकास केलाय. अशा परिस्थितीत सर्वांनी मोदींच्या पाठीशी उभं राहायला पाहिजं. खास करून राष्ट्रीय विचारानं हे प्रेरित आहे. ज्यांच्यासाठी समाज आणि राष्ट्र प्रथम आहे अशा सर्वांनी मोदींसोबत राहिलं पाहिजं. म्हणून मला विश्वास आहे की, राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीसोबत राहील. अर्थात त्यांचा पक्ष आहे, निर्णय त्यांना घ्यायचा आहे. मात्र, यावेळेला माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की, त्यांनी मोदींना पाठिंबा दिला पाहिजे.
सुनेत्रा पवार या बारामती येथून निवडून आल्या तर त्यांचा पाठिंबा नरेंद्र मोदींना असेल. सुप्रिया सुळे निवडून आल्या तर त्यांचा पाठिंबा राहुल गांधींसाठी असेल. सुनेत्रा पवार यांना दिलेलं मत मोदींसाठी जाईल. तर सुप्रिया सुळे यांना दिलेलं मत राहुल गांधींना जाईल. -देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री