हैदराबाद National Nutrition Week 2024 : ज्याप्रमाणे गाडीला चालण्यासाठी पेट्रोल किंवा डिजेलची गरज असते, त्याचप्रमाणे मानवाला देखील आपल्या शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी अन्नाची गरज असते. परंतु निरोगी राहण्यासाठी तसंच शरीरातील सर्व यंत्रणा योग्यरित्या कार्य करावी याकरिता पोषण तत्वांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्ती विशेषतः मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पोषण तत्वे ही सर्वात मोठी गरज आहे. यामुळे भारत सरकराच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत 'राष्ट्रीय पोषण सप्ताह' साजरा केला जातो.
या वर्षीची थीम : दरवर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताहासाठी एक विशिष्ट थीम सेट केली जाते. ‘सर्वांसाठी पौष्टिक आहार’ ही यावर्षीची थीम आहे.
राष्ट्रीय पोषण सप्ताहाचा इतिहास : भारत सरकारच्या अन्न व पोषण मंडळाने 1982 साली सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्याची सुरुवात केली. यामागील उद्देश म्हणजे मुलांमधील वाढत्या कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे हा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, मार्च 1975 मध्ये अमेरिकन डायटेटिक असोसिएशन आणि आता ओळखल्या जाणाऱ्या अकादमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायट सानयन्सेस या द्वारे पहिल्या राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आहारतज्ज्ञांच्या व्यवसायाला आणि शरीरासाठी आवश्यक पोषणाची गरज याला चालना देण्याच्या उद्देशानं हा दिवस महत्त्वाचा आहे. जागतिक स्तरावर या उपक्रमाचे कौतुक केलं जातं शिवाय स्थानिक लोकांचा देखील सकारात्मक प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतो. 1980 मध्ये हा कार्यक्रम आठवड्याऐवजी महिनाभर साजरा केला जात होता.