मुंबई - Manthan at Cannes 2024 : 77 व्या 'कान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये श्याम बेनेगल दिग्दर्शित, 1976 साली प्रदर्शित झालेल्या 'मंथन' चित्रपटाच्या 4K आवृत्तीचं प्रदर्शन झालं. भारतीय चित्रपट इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात पार पडलं.
गुजरातमधील भारताची पहिली सहकारी तत्वावरील डेअरी संस्थेची कथा या चित्रपटातून उलगडली जाते. 'कान फिल्म फेस्टिव्हल'मधील साल्ले बुनुएल थिएटरमध्ये दाखवण्यात आलेल्या या कालातीत चित्रपटानं उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली.
'मंथन' मध्ये मुख्य भूमिका करणाऱ्या नसीरुद्दीन शाह आणि तसंच स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, अमरीश पुरी आणि संगीत दिग्दर्शक वनराज भाटिया यांनी या चित्रपटाच्या प्रेरणादायी कथेतून डॉ. वर्गीस कुरियन यांना आदरांजली वाहिली होती. या चित्रपटाचा अनुभव शेअर करताना त्यांनी या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल याबद्दल मनात साशंकता होती असं म्हटलं. परंतु या चित्रपटाला मिळालेल्या अनपेक्षित यशाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या चित्रपटात सहभागी झालेल्या सर्वांचं करियर यामुळे उजळून निघाल्याचंही शाह यांनी सांगितलं.
श्याम बेनेगल यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सामाजिक वास्तव मांडणाऱ्या 'मंथन' चित्रपटानं मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटसृष्टीतही आपलं अढळ स्थान निर्माण केलं. 1977 मध्ये दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर नाव कोरलेल्या या चित्रपटानं 1976 च्या अकादमी पुरस्कारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आणि जागतिक स्तरावर त्याचे महत्त्व अधोरेखित केलं. प्रसाद कॉर्पोरेशन आणि L'Immagine Ritrovata प्रयोगशाळेच्या सहकार्याने फिल्म हेरिटेज फाउंडेशन (FHF) ने हाती घेतलेल्या जीर्णोद्धार प्रक्रियेमुळे चित्रपटाला नवीन जीवन मिळाले आणि भविष्यातील पिढ्यांसाठी चित्रपटाचा वारसा जतन झाला आहे.
'मंथन'चं स्क्रीनिंग हा दिवंगत स्मिता पाटील आणि डॉ. वर्गीस कुरियन यांच्या कुटुंबीयांसाठी एक भावनिक क्षण होता. स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर त्याच्या मामी अनिता पाटील देशमुख आणि मन्या पाटील सेठ यांच्यासह स्क्रीनिंगला उपस्थित होता. डॉ. वर्गीस कुरियन यांची कन्या निर्मला कुरियन यांनीही या स्क्रिनिंगला उपस्थिती दर्शवली. मंथनची पुनर्संचयित आवृत्ती 1 जून रोजी 70 शहरांमध्ये रिलीज होण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा -
- कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय स्टार्सचा जलवा... - Cannes 2024 Film Festival
- कान्सच्या रेड कार्पेटवर दुसऱ्या दिवशी ग्लॅमरस स्टाईलमध्ये अवतरली ऐश्वर्या राय - CANNES FILM FESTIVAL 2024
- सशस्त्र रक्षकांसह सलमान खानची एअरपोर्टवर एन्ट्री, जॅकलिन फर्नांडिस कान्सला रवाना - Salman Khan