मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित कपूर फॅमिलीनं राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीचा भव्य सोहळा साजरा केला. काल शुक्रवारी झालेल्या या आकर्षक कार्यक्रमात दिग्गज सेलेब्रिटींनी हजेरी लावत शोमॅनच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी दिग्गज अभिनेत्री रेखा हजर होती. यावेळी अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा रेखाला पाहिल्यानंतर तिच्या जवळ गेला आणि अभिवादन केलं. यावेळी रेखानं त्याला आपल्या ऊबदार मिठीत घेऊन मायेनं गोंजारलं. रेखा आणि अगस्त्य नंदा यांच्या या मन मोहरुन टाकणाऱ्या क्षणाने नेटिझन्स वेडावले नसते तरच नवल!
राज कपूर यांच्या शताब्दी जयंतीच्या मुंबईतील कार्यक्रमापूर्वी कपूर फॅमिलीनं दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनाही या सोहळ्याचं आमंत्रण दिलं. काल शुक्रवारी मुंबईत राज कपूर यांच्या चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली. हा महोत्सव 13 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये राज कपूर यांच्या सर्वात प्रतिष्ठित 10 चित्रपटांचं प्रदर्शन देशातील विविध शहरात होणार आहे.
मुंबईतील कार्यक्रमातील अनेक खास क्षणांपैकी सदाबहार अभिनेत्री रेखा आणि अगस्त्य यांच्यातील एक संवाद होता. त्यांच्यातील हृदयस्पर्शी देवाणघेवाणीत, रेखानं अगस्त्याला प्रेमानं मिठी मारली आणि त्याच्या गालावर हात ठेवून त्याच्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईत पार पडलेला शोमॅन राज कपूर यांचा शताब्दी जयंती उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम भव्य आणि आकर्षक होता. यावेळी संपूर्ण कपूर फॅमिलीसह भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरपासून ते करीना कपूर खान आणि सैफ अली खानपर्यंत, तारे-तारकांच्या उपस्थितीतला हा सोहळा एक व्हिज्युअल ट्रीट होता. त्यांच्यबरोबर करिश्मा कपूर, नीतू कपूर, रणधीर कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी यांनी संध्याकाळच्या ग्लॅमरमध्ये भर घातली. कार्तिक आर्यन, राजकुमार हिरानी, महेश भट्ट आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीनं शुक्रवारची संध्याकाळ आणखी उजळून निघाली.
या कार्यक्रमाला करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन हजर होते. त्यांच्यातील ब्रेकअपनंतर ते या सोहळ्यात दिसल्यानं उपस्थितींमध्ये एक उत्सुकता होती. याबरोबरच बच्चन यांची कन्या श्वेता बच्चन नंदा हिनं राज कपूरची नात रितू नंदा यांचा मुलगा निखिल नंदा याच्याशी विवाह केला आहे. त्यामुळे श्वेताही या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग होती. श्वेता आणि तिची मुले, नव्या आणि अगस्त्य यांचे कपूर कुटुंबाशी जवळचं नातं आहे.