मुंबई - Kartik Aaryan : सध्या कार्तिक आर्यन त्याचा आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट 14 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची कहाणी पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये कार्तिकनं मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी कार्तिकनं खूप मेहनत घेतली असून त्याच्यामधील हे ट्रांसफॉर्मेशन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. दरम्यान, मुंबईतमध्ये हा चित्रपट कार्तिक आर्यननं खरा हिरो आणि भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्याबरोबर पाहिला.
'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचं स्क्रिनिंग :'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट पाहिल्यानंतर मुरलीकांत पेटकर यांचा मुलगा भावूक होऊन त्यानं कार्तिक आणि चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांना मिठी मारली. यानंतर कार्तिक मुरलीकांत यांच्याकडे गेला आणि तो देखील भावूक झाला. कार्तिक आर्यननं 'चंदू चॅम्पियन'च्या स्क्रिनिंगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुरलीकांत पेटकर बरोबर कार्तिक दिसत आहे. या स्क्रिनिंगला भारतीय भूदलामधील अधिकारीही आल्याचं दिसलं. 'चंदू चॅम्पियन'च्या पहिल्या स्क्रीनिंगचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत कार्तिकनं यावर लिहिलं, "चंदू चॅम्पियन'चे पहिले स्क्रिनिंग रिअल हिरो मुरलीकांत पेटकर सरांबरोबर, अनेक त्रासानंतरही आत्मसमर्पण करण्यास नकार देणारा माणूस, चित्रपटाचं प्रदर्शित होण्यासाठी दोन दिवस बाकी आहे."