मुंबई - LOK SABHA ELECTION 2024 : आज मुंबईत सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मोठ्या संख्येनं बॉलिवूड सेलेब्रिटी मतदान करत आहेत. ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र, हेमा मालिनी, जावेद अख्तर, शबाना आझमी, राहुल बोस, परेश रावल, विद्या बालन, अक्षय कुमार, फरहान अख्तर, जान्हवी कपूर, कैलाश खेर, शाहिद कपूर, रणदीप हुडा, राजकुमार राव, सुनिल शेट्टी यांनी मतदान केलं आहे. मतदानानंतर सर्वांनीच लोकशाहीच्या या उत्सवात सामील होण्याचं आवाहन ते करत आहेत.
ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांनी मुंबईत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यांची पत्नी आणि भाजप खासदार हेमा मालिनी, तिची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओल यांनी मुंबईतील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर त्यांच्या बोटांवर लागलेली शाईच्या खुणा दाखवल्या. मतदान केल्यानंतर अभिनेत्री ईशा देओल म्हणाली, "मी लोकांना आवाहन करतो की बाहेर या आणि मतदान करा. हा आपला अधिकार आहे. प्रत्येक मत मोजलं जातं. ते (पीएम मोदी) देशासाठी खूप काही करत आहेत. केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ते आपल्या देशाला घेऊन जात आहेत.
रणदीप हुडानं मुंबईत मतदान केल्यानंतर मतदारांना आवाहन करताना सांगितलं, "लोकशाहीमध्ये तुम्हाला तुमचं आणि देशाचं भविष्य मतदानातून ठरत असतं त्यामुळे लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हा. भविष्य, देशाला कणखर बनवण्यासाठी आणि विकासासाठी मतदान केलं पाहिजे."
हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यतनाम गायक कैलाश खेर यांनी मतदान केल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाला, "आमचे तरुण आणि वयस्क मुंबईकर घामानं भिजलेले असताना लोकशाहीच्या उत्सवात सामील होताना मनातून हसत आहेत. याच्या इतका मोठा उत्सव कोणता असेल. 'ये मेरे भारत बदल रहा है, इस बदलाव का कारण है आप बस राष्ट्र हित में ऐसे ही जुटे रहे, व्होट करते रहे.' "