मुंबई - Amitabh Bachchan dangerous stunts : मेगास्टार अमिताभ बच्चननं अनेक प्रकारच्या चित्रपटांना आपल्या शंभर टक्के समर्पणानं आकार दिला आहे. 'सात हिंदुस्तानी' या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातून त्यानं आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पूर्वी शूटिंग करताना बॉडी डबल्स किंवा अत्याधुनिक स्पेशल इफेक्ट्सचा वापर होत नसे. या सुविधांच्यामुळे आजच्या काळात शूटिंग करताना कलाकारांना अॅक्शन सीन्स आरामात आणि सुरक्षितपणे करण्यास मदत होते. अमिताभ यांनी आपल्या काळात केलेल्या एका धोकादायक सीनबद्दल सांगितलं आहे. त्यानं कोणत्याही सुरक्षा जाळ्याशिवाय अॅक्शन सीन कसा साकारला होता त्याचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे.
बॉलिवूडच्या शहेनशाह अमिताभने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून जीव धोक्यात घालून केलेल्या अॅक्शन सीनची आठवण झाली. त्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये अमिताभ एका कड्यावरुन खोल ठिकाणी उडी घेत असताना दिसत आहे. त्याकाळात असं साहस करणं हे खूपच जीवघेणं होतं, याची जाणीव आज बच्चनला आहे. पण प्रेक्षकांना खूश करण्यासाठी, त्यांना सीन खरा वाटावा यासाठी कलाकारांना कशा प्रकारच्या धोक्यांना सामोरं जावं लागत होतं याची उदाहरणच त्यानं सांगितलंय. "...अॅक्शन सीक्वेन्ससाठी ३० फूट उंच डोंगरावरून उडी घेतली...कोणतंही सुरक्षा कवच नाही, फेस रिप्लेसमेंट नाही, व्हिएफएक्स नाही.. आणि लँडिंग.. एरर .. गाद्यांवर.. जर तुम्ही नशीबवान असाल तर.. ते दिवस माझे होते मित्रांनो," असं बच्चनने फोटो शेअर करताना लिहिलंय.
बच्चननं फोटो शेअर करताच, त्याच्या समर्पित फॉलोअर्सनी कमेटं सेक्शन भरुन टाकलं आणि त्याच्याबद्दलचा अभिमान व्यक्त करत कौतुक केलं. एका युजरनं पोस्ट शेअर होताच लिहिले, "अमितजी तुम्ही नेहमीच सर्वोत्तम होता आणि नेहमीच राहाल." दुसऱ्या चाहत्याने कमेंट केली: "बरोबर सर....म्हणूनच आम्ही तुम्हाला म्हणत असतो...रियल अॅक्शन हिरो....सॅल्यूट."