कर्नाटक Karnataka MUDA Scam : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर मुडा जमीन घोटाळा प्रकरणी विरोधकांकडून सातत्यानं आरोप होत आहेत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी या प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. थावरचंद गेहलोत यांनी दिलेल्या परवानगीविरोधात आता काँग्रेसनं उद्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे मुख्यमंत्र्यांच्या वतीनं याचिका दाखल करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेणार : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी म्हैसूर नागरी विकास प्राधिकरणातील कथित जागा वाटप घोटाळ्याप्रकरणी खटला चालवण्यास परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 22 ऑगस्ट रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. विधानसभेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक होणार आहे. ही बैठक मुडा घोटाळ्याशी घडामोडीशी संबंधित आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती मुख्यमंत्री काँग्रेस आमदारांना कळवणार आहेत. काँग्रेसकडून कायदेशीर आणि राजकीय पद्धतीनं खटला लढण्याची रणनीती तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
- काँग्रेस उद्या राज्यव्यापी आंदोलन करणार :राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुडा मधील जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी दिल्याच्या विरोधात काँग्रेस उद्या राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.